पूरामुळे ४८ जणांचा मृत्यू; जनजीवन पूर्णत: विस्कळीत
भारतातल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने मणिपूर आणि आसाममध्ये हाहाकार केला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात पूर आला असून पूरस्थिती खूपच गंभीर आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पूरामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरामध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पूरामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशामध्ये या दोन्ही राज्यांसाठी पुढचे काही दिवस आणखी महत्वाचे आहे. भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. लष्कर, आसाम रायफल्स, राज्य पोलिस, मणिपूर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. पूरात अडकलेल्या नागरिकांना पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे.
आसाममध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे तर मणिपूरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अशापद्धतीने दोन्ही राज्यामध्ये एकूण ४८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी आसाममध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. तर मणिपूरमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. आसाममधील एकूण पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस आणि पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पूरामुळे आसामच्या २९ जिल्ह्यांतील १६.२५ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. तर मणिपूरमधील पूरग्रस्त भागातून २००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
१०५ महसुली विभागांतर्गत २८०० गावे अजूनही पाण्यात बुडाली आहेत. ३९४५१.५१ हेक्टरवरील पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. आसाममध्ये, ३.८६ लाखांहून अधिक नागरिक २४ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने स्थापन केलेल्या ५१५ मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये आश्रय घेत आहेत. गेल्या २४ तासांत पुराच्या पाण्यामुळे मणिपूर आणि आसाम या दोन्ही राज्यातील शेकडो रस्ते, डझनभर पूल आणि हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यात ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
