विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र; सातारा राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण
सातारा : राज्याचा पूर्ण विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले विविध सेल सुरु केले आहेत. त्यापैकीच वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी सरदार (सागर) भोगांवकर यांची निवड करण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भोगांवकर यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीने सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरदार (सागर) भोगांवकर यांनी अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेवून आपल्या सामाजिक कार्यास प्रारंभ केला. यातूनच त्यांची आम आदमी पक्षाच्या जिल्हा सचिव पदी निवड झाली. पदाची गरिमा राखून भोगावकर यांनी समाजासाठी, अन्यायग्रस्त, उपेक्षितांसाठी विविध आंदोलने केली. जिथे अन्याय दिसेल, तिथे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.
कोरोना महामारीच्या काळात कोणताही दीन, दलित उपाशी राहू नये म्हणून दिवस-रात्र जिथे-जिथे वाड्या-वस्त्या आहेत, त्याठिकाणी स्वखर्चाने अन्नाची पाकिटे देण्याचे स्तुत्य काम त्यांनी केले. त्यांच्या या कामाची दखल वरिष्ठांनी घेत त्यांची आम आदमी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने भोगांवकर यांनी पक्षाचे विविध मेळावे घेत आणि अंगभूत गुण असल्याने कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज तयार केली.
कालांतराने काही कारणास्तव भोगांवकर यांनी आम आदमी पार्टीच्या पदाचा राजीनामा देवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये त्यांचे स्वागत स्वत: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. भोगांवकर यांच्या कामाचा धडाका, त्यांचा जनसंपर्क पाहता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदासाठी भोगांवकर यांची एक वर्षाकरता नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य अध्यक्ष जितेंद्र सातव आणि सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नियुक्तीनंतर बोलताना भोगांवकर म्हणाले, रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून यापुढे माझे मार्गक्रमण राहणार आहे. याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्यातील एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी राष्ट्रवादीची ध्येयधोरणे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी जी संधी मिळवून दिली आहे. त्या संधीचा समाजाला तसेच रुग्णांना पुरेपूर फायदा होईल, यादृष्टीनेच माझी वाटचाल राहणार आहे.
भोगांवकर यांच्या निवडीने सातारा जिल्हा राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
