कराड : बेळगाव येथे शिवगंगा स्टेडियममध्ये सलग ७५ तास व रिव्हर्स शंभर मीटर स्केटिंग करून कराडच्या ईगल स्केटिंग ॲण्ड रोल बॉल ॲकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडू समर्थ रमेश साळुंखे (रा. सैदापूर, ता. कराड) याच्यासह परिसरातील सुजल माळवदे, शर्वरी यादव, शिवांश बाबर, सईशा चव्हाण व अभंग तांबे या सहा खेळाडूंनी विक्रम करून राज्य व देशाचा नावलौकिक वाढवला.
नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात समर्थ साळुंखेसह इतर सहा खेळाडूंची निवड झाली आहे. त्याबद्दल यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या खेळाडूंनी गेल्या वर्षी सलग ४८ तास स्केटिंग करून अकरा सेकंदात शंभर मीटर स्केटिंगचा विक्रम केला होता, तर त्यांनी नुकताच ७५ तास स्केटिंगमध्ये १४.८४ सेकंदात शंभर मीटर रिव्हर्स स्केटिंगचा उच्चांक करून गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून सलग दोन वर्षे सन्मानाचे प्रशस्तिपत्रक मिळवले.
समर्थ साळुंखेने गोवा व दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. त्याने क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यास रत्नागिरी येथे क्रीडा विकास परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत देशपातळीवर हिंदरत्न किताब पटकावला, तसेच फोनिक्स राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.
स्केटिंग प्रशिक्षक अझर मुल्ला, राष्ट्रीय प्रशिक्षिका बुशारा मुल्ला यांचे समर्थला मार्गदर्शन लाभले आहे. ईगल स्केटिंग ॲकॅडमीचे संस्थापक सलीम मुल्ला, डॉ. परेश पाटील, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या जयमाला शिर्के, ग्रामस्थ आदींनी समर्थ साळुंखेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रयत इंग्लिश मीडियम स्कूलचा तो विद्यार्थी आहे. त्यांचे सुमारे साठ जणांचे एकत्रित कुटुंब म्हणून ओळख आहे.
