18 प्रवाशांचा मृत्यू
उत्तरप्रदेश : गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशात एका स्लीपर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशातील बेहता मुजावर परिसरात हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात बस आणि कंटेनरचाही अक्षरश: चुराडा झाला. उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात घडला. लखनौ-आग्रा महामार्गावर बेहता मुजावर परिसरात असलेल्या उभ्या दुधाच्या कंटेनरला डबलडेकर बसने जोरदार धडक दिली.
दोन्ही वाहनांचा चुराडा :
दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या या स्लीपर बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. महामार्गावर वेगाने बस चालवणाऱ्या चालकाने बसवर नियंत्रण न ठेवता आल्याने ही बस थेट दुधाच्या टँकरला धडकली. हा टँकर महामार्गाच्या कडेला उभा होता. तर ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. यावेळी यात मोठ्या संख्येने प्रवासी होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.
या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर 20 पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या बांगरमौ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांकडून हा अपघात कसा घडला, याचा संपूर्ण तपास सुरु आहे.
