कास : जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावरील पावसाळी पर्यटन सुरू झाले असून, ज्या रंगीबेरंगी, विविध जातींच्या फुलांसाठी कास प्रसिद्ध आहे, तो फुलांचा हंगाम तोंडावर असताना कास पठारावरील पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा वाढविण्याची गरज आहे.
कास पठाराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी सहा गावांची कार्यकारी समिती आहे. ही समिती व वन विभाग यांच्या वतीने कासचा कारभार पाहिला जातो. आगामी हंगामाच्या दृष्टीने समितीच्या वतीने कास पठारावर तंगूसची जाळी लावण्यात आली आहे. फुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे काम झाले असले तरी पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
वाहतुकीसाठी सायकल, इलेक्ट्रिक कारची गरज…
कास पठारावर फिरण्यासाठी शेकडो हेक्टरचा परिसर आहे. हा सर्व परिसर पायी फिरावा लागतो, तसेच राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे जायचे झाल्यास दोन किलोमीटर अंतर चालावे लागते. कास समितीने या ठिकाणी भाड्याने सायकली ठेवल्या असल्या तरी सर्वांना सायकलवर जाणे सोयीचे होत नाही. त्यामुळे सायकलसह इलेक्ट्रिक कारचा किंवा इतर पर्यायी साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे.
या दृष्टीने सातारा नगरपालिकेने कास पठारावर दिलेली इलेक्ट्रिक कार सध्या धूळखात पडली असून, तिचा वापर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे आहे. याचबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी, प्रथमोपचार साहित्य, आवश्यकता भासल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध असणे, अनुभवी तज्ज्ञ गाइड या सुविधाही अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
निवारा शेड…
कासला एका दिवसात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. त्या दृष्टीने पठारावर वृद्ध, महिला, मुले यांच्यासाठी निवाऱ्याची गरज असते. राजमार्गाहून कुमुदिनी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेड आहेत; पण पर्यटकांच्या संख्येच्या दृष्टीने ही शेड अपुरी ठरतात. त्यामुळे धुके, पाऊस व सोसाट्याचा वारा असणाऱ्या कास पठारावर निवारा शेडची गरज जाणवत आहे.
स्वच्छतागृह…
कास पठारावर स्वच्छतागृहांची सोय असली तरी ही स्वच्छता गृहे खराब झाली आहेत. त्यांची दुरुस्ती करून व आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे पर्यटकांसाठी तयार ठेवली पाहिजेत.
वाहतूक कोंडीचा पर्यटकांना फटका…
सलग येणाऱ्या सुट्या, शनिवार व रविवार अशा वेळी मोठ्या संख्येने पर्यटक पठारावर येत असतात. गतवर्षी सातारा-कास रस्त्यावर ट्रॅफिक जाम होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. त्यामुळे या वाहतूक कोंडीत अडकून अनेकांना पठारावर पोचताच आले नाही. फुले न पाहताच अनेकांनी एकीव मेढामार्गे वाहने वळवून माघारी फिरणे पसंत केले. त्यातून पैसे खर्च करून ही निराशा पदरी पडली.
त्यामुळे सुटीच्या वेळी मर्यादित प्रवेश ठेऊन या समस्येवर मार्ग काढावा लागणार आहे. त्याचप्रमाणे घाटाई फाटा व कास तलाव येथे असणारे पार्किंगही काही वेळा कमी पडत असल्याने पार्किंगसाठी पठाराभोवती असणाऱ्या अंधारी, सह्याद्रीनगर मार्गांचा वापर करून विविध ठिकाणी पार्किंग ठेवल्यास एका ठिकाणी होणारी गर्दी टाळून वाहतूक कोंडीची समस्या टाळता येणार आहे.
