नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्थेच्या अंतराळयानात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (10 जुलै) रात्री 8.30 वाजता नासाच्या लाईव्ह कॉन्फरन्समध्ये पृथ्वीवर परत येण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. अंतराळातून पाठवलेल्या संदेशात सुनीता म्हणाल्या, “या अंतराळयानावर माझा विश्वास आहे. आम्हाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत घेऊन येईल.”
ने काही दिवसांपूर्वी बोइंग स्टारलाइनर या अंतराळयानाचे अवकाशातील वास्तव्य 45 ते 90 दिवसांनी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर सुनीतांचा हा संदेश आला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) एक महिनाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर ही पहिलीच वेळ सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
या अंतराळ प्रवासादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी “अपयश हा पर्याय नाही” असे स्पष्ट करत अंतराळवीर बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थानकावर थांबण्यामागील हेतू फक्त अंतराळयानाची चाचणी घेणे हाच असल्याचे सांगितले. बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना 5 जून रोजी फ्लोरिडातून स्टारलाइनर या अंतराळयानाद्वारे अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या जोडले गेले.
लाईव्ह सेशनमध्ये सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि लाईव्हद्वारे अवकाशातील स्थिती बद्दल संपूर्ण जगाशी संवाद साधला तसेच या मिशन मधून अजून बरेच काही चांगले साध्य होणार आहे अशी आशाही दाखवली.
