गुरु पौर्णिमेनिमित्त सदन येथे विविध धार्मिक कार्यक्रम
सातारा : श्री क्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने यावर्षी यंदाच्या चातुर्मास दि. १७/७/२०२४ ते १२/११/२०२४ अखेर संपन्न होत आहे. या उपक्रमात नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते व कलाकार सहभागी होणार आहेत. यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त दि. २७ जुलै रोजी पारंपारिक पध्दतीने सकाळी नामस्मरण, महापूजा, लघुरुद्र इ. धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. समर्थ सेवा मंडळाच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात हे सर्व कार्यक्रम संपन्न होणार असून संत ज्ञानपीठाच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम लोकाश्रयावर चालतात म्हणूनच समर्थ भक्तांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सढळहस्ते आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती व आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
समर्थ सेवा मंडळाच्या या चातुर्मास उपक्रमाचा शुभारंभ दि. १७/७/२०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंडळाचे कार्यवाहक योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे. त्यानंतर समर्थ भक्त स.भ. श्री शामबुवा धुमकेकर, नागपूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. या उपक्रमांतर्गत कार्यक्रमांमध्ये दि.17 जुलै ते दि.19 जुलै रोजी नागपूर येथील समर्थ भक्त श्याम बुवा धुमकेकर यांचे कीर्तन होणार आहे. दि.20 जुलै आणि दि.२१ जुलैला सज्जनगड येथील समर्थ भक्त अजेयबुवा देशपांडे रामदासी यांचे प्रवचन होणार आहे. दि.22 व दि.23 जुलैला संदीपबुवा मांडके पुणे यांचे कीर्तन होणार आहे. तर दि.24 जुलै ते दि.25 जुलै धाराशिव येथील समर्थभक्त पद्मनाभ व्यास यांचे प्रवचन होणार आहे. दि.26 व दि.27 जुलैला डोंबिवली मुंबई येथील समर्थ भक्त सौ. अलकाताई मुतालिक यांचे प्रवचन होणार आहे. दि.28 व दि.29 जुलैला संगमेश्वर येथील समर्थ भक्त महेश वाघ आणि यांचे कीर्तन होणार आहे. दि.30 जुलै रोजी वाशी नवी मुंबई येथील सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे प्रवचन होणार असून दि. 31 जुलैला ठाणे येथील अरुंधती उकिडवे यांचे प्रवचन होणार आहे.
उपक्रमांतर्गत सर्व कीर्तन कार्यक्रमांसाठी संवादिनीवर साथ बाळासाहेब चव्हाण यांची असून, तबला साथ विश्वनाथ पुरोहित हे करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सातारकरांनी उपस्थित राहून चातुर्मासाचा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा असे आवाहन मंडळाचे वतीने कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, कार्याध्यक्ष गोडबोले व मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी केले आहे. तसेच हे सर्व कार्यक्रम समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, मुरलीधर उर्फ राजू कुलकर्णी सौ.कल्पना ताडे, राजाभाऊ कुलकर्णी, रवीबुवा आचार्य, देसाई वहिनी आदी सहकार्यांच्या विशेष परीश्रमातून संपन्न होत आहेत.
