सातारा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातारा विभागाच्या वतीने जादा २१५ एसटी बसची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११ डेपोतून प्रवाशांना जादा गाड्यांची सेवा २१ जुलैपर्यंत दिली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त भाविकांनी एसटी बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा (ता. १७) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या सोहळ्यानिमित्त श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून दहा ते बारा दिवस भाविकांची गर्दी असते. याच काळात सातारा जिल्ह्यातील पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी असते.
त्यासाठी जिल्हा एसटी प्रशासनाने फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये यात्रा कालावधी, सप्तमी ते चतुर्दशी व पोर्णिमेपर्यंत जादा बस सोडल्या जाणार आहेत. यासाठी सातारा विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांची चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथे नेमणूक करण्यात आली आहे.
यात्रा कालावधीत सुस्थितीतील बस उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच बस स्थानकापासून २०० मीटरच्या बाहेर खासगी वाहनांचा थांबा करावा. यात्रेसाठी महिला वाहकांचा वापर टाळावा, तसेच भरतीमधील चालकांच्या हाती बस देऊ नयेत.
मुक्कामाच्या ठिकाणी चालक व वाहकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच प्रवाशांना नाहक मनस्ताप होणार नाही, यासाठी बस वेळेवर सोडाव्यात, यासह इतर सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
संगणकीय आरक्षण
पंढरपूर यात्रेचा कालावधी २१ जुलैपर्यंत राहणार आहे. तोपर्यंत जादा एसटी बस सुरू राहणार आहेत. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. या आगाऊ आरक्षणाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
