दुकानात पडलेले अडीच तोळ्यांचे ब्रेसलेट केले परत
सातारा : कोणी म्हणतं आजकाल माणुसकीच राहिली नाही. कोणी म्हणतं पैशासाठी, संपत्तीसाठी कोण काय करेल त्याचा नेम नाही; पण सुसंस्काराची वीण आणि काबाडकष्ट करण्याचा पिंड असेल, तर समाजातूनही प्रामाणिकपणाचा प्रत्यय येतो आणि माणुसकीचा धागाही अधिक दृढ होताना दिसतो.
अशीच घटना स्वयंवर मंगल कार्यालयानजीकच्या वसंत टेलर्स या दुकानात घडली आणि ज्यांच्याबाबत ती घडली त्यांनी दुकानाचे मालक पाटुकले यांनाही मनःपूर्वक धन्यवाद दिले.
एका वृत्त पत्रातील कर्मचारी आपल्या पत्नीसह टेलरिंग कामासाठी स्वयंवर मंगल कार्यालयानजीकच्या वसंत टेलर्स या प्रणय पाटुकले यांच्या दुकानात गेले होते. दुकानात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची दुचाकी सिटी पोस्टासमोरच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्या वेळी त्यांच्या हातात अडीच तोळ्याचे ब्रेसलेट होते. दोघांनी टेलरिंग दुकानात शिवणकामाचे कपडे दिले.
आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले. पुढे दोन- तीन दुकानांमध्ये खरेदीची कामे केल्यावर, एका औषध दुकानात औषधे घेत असताना संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या हातात ब्रेसलेट नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधितांच्या पायाखालची वाळूच सरकली.
अडीच तोळ्याचे ब्रेसलेट काही वेळापूर्वी हातात होते आणि आता ते कुठे पडले असावे, या प्रश्नाने हैराण होऊन रस्त्यावर, तसेच सर्व संबंधित दुकानांमध्ये शोधाशोध अन् विचारणा केली; परंतु हाती काही लागण्याची शक्यता दिसत नव्हती. ज्या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती, तेथेही शोधून झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या पत्नी टेलरिंग दुकानात गेल्या आणि त्यांनी पाटुकले यांना ब्रेसलेट सापडले का हो? अशी केविलवाण्या स्वरात विचारणा गेली.
तेव्हा पाटुकले यांचे वडील प्रकाश पाटुकले तेथे बाहेरच खुर्चीत बसले होते आणि प्रणय पाटुकले हे आत कार्यमग्न होते. विचारणा होताच दोघांनी कसले ब्रेसलेट? असा प्रतिप्रश्न केला आणि सोन्याचे होते म्हटल्यावर तातडीने ते आपल्या ड्रॉवरमधून काढून दाखवले. एकदम निःस्वार्थ, निर्व्याज असा तो त्या दोघांचाही हावभाव होता. आज असं कुठंच दिसत नाही.
संबंधित दांपत्याला ते ब्रेसलेट पाहून हायसे वाटले; परंतु त्याचवेळी या प्रामाणिकपणाबद्दल काय भावना व्यक्त कराव्यात, हेही समजेनासे झाले. निःशब्द झालेल्या भावना संबंधित कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या डोळ्यातून क्षणार्धात व्यक्त झाल्या. त्यानंतर पाटुकले यांनी ते ब्रेसलेट संबंधित दांपत्याला परत केले.
अशी ही गर्भश्रीमंती…
पाटुकले यांचे टेलरिंगचे हे दुकान १५ ऑगस्ट १९४७ मध्ये सुरू झाले असून, या ठिकाणी महिलांचे ब्लाऊजचे विविध प्रकार, पंजाबी ड्रेससह अन्य प्रकारचे ड्रेसेस, घागरा आदी उत्तम प्रकारचे शिवणकाम केले जाते. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही त्यांच्या या दुकानाला लाभतो आणि त्यांची सध्या तिसरी पिढी या कामात अग्रेसर आहे; पण कामावर श्रद्धा ठेवून, ग्राहकांचे समाधान करत, प्रामाणिक कष्टातून चाललेला पाटुकले कुटुंबीयांचा जीवनप्रवास त्यांच्या माणुसकीच्या गर्भश्रीमंतीचे दर्शन घडवतोय, हे मात्र निश्चित.
