मुंबई : मुंबईत आणखी एक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. घरकाम करणाऱ्या नोकरानेच मालकाला चुना लावत त्याच्याकडील कोट्यवधी रुपयांची सोन्याची लगड चोरली आणि तो फरार झाल्याची घटना जुहू परिसरात घडली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभूनारायण मिश्रा (वय 28) असे आरोपीचे नाव असून जगदीशकुमार मदनलाल गुप्ता असे फिर्यादीचे नाव आहे. जगदीशकुार हे विलेप्राले येथील जेव्हीपीडी स्किम, अग्रवाल हाऊस येथे कुटुंबियांसोबत राहतात. आरोपी प्रभूनारायण मिश्रा हा गेल्या १८ महिन्यांपासून जगदीश कुमार यांच्याकडे घरकाम करत होता. जगदीशकुमार यांनी त्यांच्या घरातील कपाटात सुमारे एक कोटी रुपय किंमतीच्या सोन्याच्या दोन लगड ठेवल्या होत्या. मात्र 10 मे ते 20 जून 2024 या कालावधीत प्रभूनारायणने कपाटातून या दोन्ही लगड काढून घेतल्या आणि घरातून पलायन केले होते.
दोन दिवसांपूर्वी हा प्रकार जगदीशकुमार गुप्ता यांच्या लक्षात आला. ही लगड प्रभूनारायणने चोरल्याचा संशय त्यांना होता. अखेर त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या प्रभूनारायणचा शोध सुरू केला आहे.
