राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांची माहिती
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या नेतृत्वाखाली बारामती (Baramati) येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान मेळावा (Jansanman meeting) होत आहे. या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून तब्बल पाच हजार कार्यकर्ते बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या तयारीचे रणशिंग फुंकण्याची तयारी बारामती मधून चालवली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर अजितदादा पवार यांचे बारकाईने लक्ष असून या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे वर्चस्व राहण्यासाठी घरटी प्रचार आणि विकासकामांचे प्रबोधन यावर भर दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती मधून झालेला विजय हा अजितदादांसाठी जोरदार राजकीय धक्का होता. त्यामुळे या सर्व राजकीय कटू आठवणी मागे ठेवून आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजितदादांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर दादा कार्यव्यस्ततेमुळे बारामतीत पोहोचू शकले नाहीत. मात्र रविवारी होणाऱ्या जनसन्मान मेळाव्यासाठी अजितदादा यांनी जोरदार तयारी केली आहे. सातारा जिल्ह्यातून म्हणजेच जिल्ह्याच्या 11 तालुक्यातून तब्बल 5000 कार्यकर्ते या मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत.
या तयारीचा आढावा नुकताच पक्षाचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने अजितदादांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार राष्ट्रवादी गट चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा दादांना आहे. सातारा जिल्ह्यात अजितदादा गटाचे वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे एकच आमदार आहेत. या जिल्ह्यात तरुण कार्यकर्त्यांची तगडी फौज उभी करण्यासाठी दादा बारामतीच्या मेळाव्यातून काय संदेश देणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
जनसन्मान मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसनजी मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. त्याद्वारे विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
