नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कारवाई
कराड : कराड (जि. सातारा) शहरासह मलकापूर व विद्यानगर परिसरात महाविद्यालये मोठ्या प्रमाणात असल्याने नेट कॅफेंची संख्या वाढली आहे. त्यामध्ये अनेकदा गैरप्रकार सुरु असल्याचे यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. त्यावर आता पोलिसांनी वॉच ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
कराडचे पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन नेट कॅफेवर नजर ठेवली जाणार आहे. त्यामध्ये जो कोणी कॅफे चालक दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे. त्या कॅफेतून तेथे चालणारे गैरप्रकार थांबवून युवकांना थोपवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी युवक-युवतींनाही अशा गैरप्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
कराड शहराच्या जवळच असलेल्या सैदापूर-विद्यानगर परिसरात सर्व प्रकारची कॉलेज आहेत. त्याचबरोबर मलकापूरलाही कॉलेज आहेत. त्या कॉलेज परिसरात दररोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींची शिक्षणासाठी ये-जा सुरु असते. त्याव्दारे त्यांची शिक्षणाची चांगली सोयही झाली आहे. मात्र, त्या परिसरात युवक-युवतींची कॅफेला चांगली पसंती मिळू लागली आहे. नेमके तेच ओळखून काही तरुणांनी कॅफेचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याव्दारे त्यांना रोजगाराचीही संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, काही जणांकडून नियमांचा भंग करुन कॅफे चालवले जात असल्याचे चित्र कॉलेज परिसरात होते. त्याचा विचार करुन पोलिसांनी कॉलेज परिसरातील कॅफेवर कारवाई केल्यावर त्यांच्या तेथे तरुण-तरुणींकडून अश्लील चाळ्यांसारखे गैरप्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
कॅफेवर कारवाई अन् युवक-युवतींचे समुपदेशन
मलकापूर आणि विद्यानगर परिसरातील कॉलेज परिसरात नेट कॅफेचे प्रमाण वाढले आहे. त्याला सरकारने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्याचे उल्लंघन करुन नेट कॅफे सुरु असल्याचे गेल्या काही वर्षांपासूनचे चित्र होते. त्यावर कारवाईचा बडगा पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर व त्यांच्या पथकाने उगारला होता. त्यावेळी २६ युवक, युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. त्याचबरोबर तीन कॅफे चालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यानंतर संबंधित युवक-युवतींच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून तरूण पिढी भरकटू नये, यासाठी पोलिसांनी महाविद्यालयीन युवक- युवतींचे समपुदेशन करुन त्यांना सोडण्यात आले होते.
पोलिसांच्या कॅफे चालकांना सूचना
कॅफे चालकांनी प्रामुख्याने इंटेरियर डिझाईन बदलल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीत दिसून आले होते. त्यामुळे संबंधित कॅफे चालकांना ते डिझाईन त्वरित बदलून सामान्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॅफे चालकांनी त्यामध्ये अंधार होईल, त्यातील हालचाली दिसणार नाहीत असे करणे टाळावे. त्याचबरोबर सीसीटीव्ही बसवावा, अशाही सूचना पोलिसांनी संबंधित कॅफे चालकांना केल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीची आता कितपत कार्यवाही होईल याची उत्सुकता आहे.
कॅफे चालकांनी नियमास अधिन राहून ते चालवावे. कोणत्याही प्रकारे त्यात हलर्जीपणा केल्यास ते पोलिस खपवून घेणार नाही. युवक-युवतींनीही आपण कॉलेजला कशासाठी आलो आहोत याचा विचार करावा. जे चालक नियमाचा उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. –अमोल ठाकुर पोलिस उपाधिक्षक, कराड
कऱ्हाडच्या विद्यानगर, मलकापूर परिसरात कॅफे आहेत. त्या चालकांना पोलिसांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास चार ते पाच कॅफे चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ती कारवाई सुरुच राहील. –के. एन. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, , कराड शहर
