नाशिकमधील अहिरे कुटुंबाला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा मान
पंढरपुर : आषाढ महिना आला की, आपल्या सगळ्यांना ओढ लागते ती आषाढी एकादशीची. आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी आणि ‘महाएकादशी’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. वारकऱ्यांची पायी वारी आज अखेर पंढरपुरातील पांडुरंगाच्या चरणी लीन झाली.
आषाढी एकादशीनिमित्त मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीची शासकीय महापूजा नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली. आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान मिळाल्याची प्रतिक्रिया अहिरे दाम्पत्यानं दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातलं. तसेच हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपण सर्वजन वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
