समर्थ सदनमध्ये चातुर्मास उपक्रमाला प्रारंभ
सातारा : येथील श्री संत ज्ञानपीठ अर्थात श्री समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यान चातुर्मास उपक्रमांतर्गत कार्यक्रमांना प्रारंभ झाला. श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, समर्थ विद्यापीठाचे कुलपती समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर, नागपूर येथील ज्येष्ठ समर्थभक्त व कीर्तनकार शाम बुवा धुमकेकर तसेच मंडळाचे सदनचे व्यवस्थापक प्रवीणबुवा कुलकर्णी, राजू कुलकर्णी, संतोष वाघ, रवीबुवा आचार्य, हार्मोनियम वादक बाळासाहेब चव्हाण, तबलावादक विश्वनाथ पुरोहित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाला.
यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी म्हणाले की, समर्थ सेवा मंडळाच्या वतीने चातुर्मास उपक्रमांतर्गत विविध मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार तसेच व्याख्यात्यांची ही खऱ्या अर्थाने एक आगळीवेगळी पर्वणी सातारकरांना मिळत आहे. गेली अनेक वर्ष हा उपक्रम सातत्याने सुरू असून या उपक्रमासाठी आपल्या सर्वांचे तन-मन-धन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. आपण या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहात, याचबरोबर या उपक्रमाबाबतची माहिती आपण इतरांना देऊन त्यांना आवर्जून अशा अवर्णनीय श्रवणाचा आनंद घेण्यासाठी हट्ट करावा असे आवाहन केले.
यावेळी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने कीर्तनकार शाम बुवा धुमकेकर यांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय कीर्तन मालेमध्ये पहिल्या दिवशी श्याम बुवा धुमकेकर यांनी ..पंढरीसी जारे सोडुनी संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग.. हा ज्येष्ठ संत तुकाराम महाराज यांचा अभंग पूर्व रंगासाठी घेतला होता. पंढरीचे महात्म्य वर्णन करताना देह हीच पंढरी असून त्यात आत्मा हा पुंडलिक आहे. आणि मन हे पुंडलिक आहे. भावभक्तीची भीमा आणि चंद्रभागा वाहत असताना घरी बसूनच आपण पंढरीला न जाताना या पंढरीचे अवर्णनीय सुख मिळवू शकतो याबाबत सुरेख विवेचन केले. तसेच उत्तर रंगात संत सावता माळी यांचे चरित्र वर्णन केले. दुसऱ्या दिवशी संतांचे सर्वस्व पांडुरंग असल्याचे आपल्या पूर्व रंगात उपस्थिताना अनेक दाखल्यातून सांगताना प्रसिद्ध कानडी संत पुरंदर दास यांचे चरित्र सांगितले.
हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून समर्थ सदन येथे या पुढील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे सदनचे व्यवस्थापक राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत दि.20 जुलै आणि दि.२१ जुलैला सज्जनगड येथील समर्थ भक्त अजेयबुवा देशपांडे रामदासी यांचे प्रवचन होणार आहे. दि.22 व दि.23 जुलैला संदीपबुवा मांडके पुणे यांचे कीर्तन होणार आहे. तर दि.24 जुलै ते दि.25 जुलै धाराशिव येथील समर्थभक्त पद्मनाभ व्यास यांचे प्रवचन होणार आहे .दि.26 व दि.27 जुलैला डोंबिवली मुंबई येथील समर्थ भक्त सौ. अलकाताई मुतालिक यांचे प्रवचन होणार आहे .दि.28 व दि.29 जुलैला संगमेश्वर येथील समर्थ भक्त महेश वाघ आणि यांचे कीर्तन होणार आहे. दि.30 जुलै रोजी वाशी नवी मुंबई येथील सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे प्रवचन होणार असून दि. 31 जुलैला ठाणे येथील अरुंधती उकिडवे यांचे प्रवचन होणार आहे.
उपक्रमांतर्गत सर्व कीर्तन कार्यक्रमांसाठी संवादिनीवर साथ बाळासाहेब चव्हाण यांची असून, तबला साथ विश्वनाथ पुरोहित हे करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सातारकरांनी उपस्थित राहून चातुर्मासाचा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा असे आवाहन मंडळाचे वतीने कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, कार्याध्यक्ष गोडबोले व मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी केले आहे. तसेच हे सर्व कार्यक्रम समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, मुरलीधर उर्फ राजू कुलकर्णी सौ .कल्पना ताडे, राजाभाऊ कुलकर्णी, रवीबुवा आचार्य, देसाई वहिनी आदी सहकार्यांच्या विशेष परीश्रमातून संपन्न होत आहेत.
