Explore

Search

April 15, 2025 9:13 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सातारा दौर्‍यामध्ये अजितदादांची विधानसभेसाठी राजकीय पेरणी

जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (DCM) अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांनी शुक्रवारी सातारा (Satara) जिल्ह्याच्या दौर्‍यामध्ये विधानसभेची पेरणी सुरू केली. येथील पोवई नाक्यावरील नूतन राष्ट्रवादी कार्यालयामध्ये (New NCP Office) अजितदादांनी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व कार्याध्यक्ष अमितदादा कदम तसेच निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. याचबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि मतदारसंघाच्या सर्वेक्षणानंतर इलेक्टिव्ह मेरिटच्या उमेदवारांचा शोध हा अजित दादांनी रडारावर घेतला आहे.
याशिवाय राष्ट्रवादीच्या विस्तारित कामा संदर्भात त्यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. अजितदादा पवार हे गुरुवारी रात्री मुक्कामी सातार्‍यात होते. कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या घरी स्नेहभोजन घेतल्यानंतर दादा शासकीय विश्रामगृहामध्ये रवाना झाले. अजितदादा यांच्याकडे अमितदादा कदम मित्र समूहाच्या वतीने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या दालनामध्ये अजितदादांनी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, चिटणीस श्रीनिवास शिंदे, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगांवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे निर्देश पदाधिकार्‍यांना दिले आहेत. शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे बैठक घेऊन वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्याची रणनीती निश्चित केली आहे. या संदर्भाने अजितदादांनी सुद्धा सातार्‍यात तळ देऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. बारामती येथे झालेल्या जन्मसन्मान मेळाव्यामध्ये दादांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्याचा पहिला टप्पा पिंपरी चिंचवड येथे शनिवारी होणार्‍या पहिल्या मेळाव्यातून होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातही असाच मेळावा घेऊन प्रत्यक्ष तयारीचे संकेत दिले जातील, असा अंदाज आहे. अजितदादांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी करा व पक्ष रचना मजबूत करा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी मजबूत करून हाय मेरिट चे उमेदवार शोधणे हा पुढील अजेंडा असणार आहे.
अजितदादा पवार या संदर्भात म्हणाले, महायुतीच्या बैठकीमध्ये 288 मतदार संघाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राजकीय ताकतीचा अंदाज घेऊन त्या-त्या कार्यक्षेत्रामध्ये विधानसभेचे उमेदवार निश्चित केले जातील. त्यादृष्टीने सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत असेल तर जास्त जागांवर मागणी करणे शक्य होणार आहे. त्यासाठीच सदस्य नोंदणी पासून ते जिल्ह्यातील बूथ रचनेपर्यंत कार्यकर्त्यांची साखळी उभी राहिली पाहिजे, असे दादांनी निर्देश दिल्याचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचताच अजितदादांचे आदेश…
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नूतन वास्तूत पोहोचताच इमारतीची पाहणी केली. तसेच ज्याठिकाणी त्यांना खटकले, त्याठिकाणच्या दुरस्त्या करण्याचेही त्यांनी सांगितले. पोवई नाक्यावरील या राष्ट्रवादी कार्यालयाचा विस्तार करण्याचे निर्देश अजितदादा पवार यांनी पदाधिकार्‍यांना दिले. कार्यालयासमोर मोठा उतार असल्याने ती जागा उचलून तिथे पायर्‍यांचे टप्पे करणे, नागरिकांना वेटिंग रूम, प्रसाधनगृह, पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy