सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसीने भर पडली आहे.
जलाशयाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कोयनानगर व नवजाच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला होता, तर आज महाबळेश्वरच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला असून, धरण मजबूत स्थितीत पोचले आहे.
बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला तो (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत तसाच टिकून राहिला. गुरुवारी झालेल्या पावसाचे पाणी दऱ्याखोऱ्यातून धरणाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले.
त्यामुळे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पाण्याची दुप्पट आवक झाली. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, धरणाचा पाणीसाठा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे.
गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ८९, नवजाला १५६ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पाणीपातळी २१०५.०८ फुटी झाली आहे. गेल्या २४ तासांत जलाशयात ३.४९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, पूर्व भागात गेली दोन दिवस संततधार पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पश्चिम भागात भात लावणी अंतिम टप्प्यात असून, पूर्व भागात मात्र आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत.
