Explore

Search

April 12, 2025 8:43 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये आषाढी दिंडीसह वृक्षदिंडी उत्साहात

नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या स्वागत कमानी चे उद्घाटन संपन्न…

सातारा : श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये आषाढी दिंडीसह वृक्षदिंडी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या स्वागत कमानी चे उद्घाटन करण्यात आले. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रमध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या कै. सौ.कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री.छ. प्रतापसिंह महाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा या शैक्षणिक संकुलामध्ये आषाढी दिंडी आणि वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडी सोहळ्याचे प्रस्थान संस्थेचे उपाध्यक्ष श्री निर्मलसिंग  बन्सल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून, श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव संजीव माने, संचालक छगन पटेल, संचलिका सौ.वासंती माने, शाळा व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थ नगर, अहिरे कॉलनी, रामनगर, शेडगे वस्ती, अमरलक्ष्मी कॉलनी या परिसरातून टाळ मृदुंगाच्या निनादात, विठू नामाच्या गजरात या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात सहभागी बाल वारकरी तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती भगव्या पताका घेत, टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल-रखुमाई चा जयघोष केला.

यावेळी वृक्षदिंडीचेही आयोजन शाळेमार्फत करण्यात आले होते. या प्रसंगी वृक्षांचे जतन व महत्त्व तसेच वृक्ष संवर्धन याबाबत सामाजिक संदेश, घोषणा व घोषवाक्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थी व पालकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली. या पालखी सोहळ्याचे समर्थनगर व संभाजीनगरवासियांनी ठिकठिकाणी स्वागत केले.

याप्रसंगी शैक्षणिक संकुलामध्ये शाळेच्या नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या स्वागत कमानीचे व बालवाडी वर्ग खोल्यांचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य अमोल साळुंखे, माध्यमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य सुखदेव शिंदे, प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष अमोल काटे, माध्यमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष शामराव पवार, तसेच नवनियुक्त शाळा प्रतिनिधी (प्राथमिक) वेदांत कदम, शाळा प्रतिनिधी (माध्यमिक) समर्थ कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक झाले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy