नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. आज सर्वात जास्त कोयनानगरला १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना जलाशयात २४ तासांत सव्वाचार टीएमसी पाणीसाठा वाढला असून, एकूण पाणीसाठा ६६.१७ टीएमसी झाला आहे. त्यामुळे काल सकाळी दहा वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करण्यात आले.
त्यातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून, धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. हवामान खात्याने मुसळधार पाऊस अजून दोन दिवस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
गेली दोन दिवस सातत्य राखत मुसळधार पाऊस पडत असून, गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १८२, नवजाला १५८ आणि महाबळेश्वरला १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी १६८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४९ हजार ४५२ क्युसेक पाण्याची आवक होत असून, जलाशयाच्या पाणीसाठ्यात ४.२० टीएमसीने वाढ झाली आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ६६.१७ टीएमसी झाला आहे.
पाणीपातळी २१२५.०७ फूट झाली असून, वक्र दरवाजापर्यंत पाणीपातळी २ हजार १३३.६ फूट झाली की पाणी पोचेल. पावसाचा जोर कायम राहिला, तर दोन दिवसांत पाणी दरवाजा गाठेल. सध्या कोयनानगर पाणलोट क्षेत्रात १५० मिलिमीटर सरासरी पाऊस पडत असल्याने धरणाने ६५ टीएमसीचा टप्पा पार केला आहे.
आठवड्याभरातील पावसाने जलचित्र पालटले असून, कोयना धरण तर बघता- बघता दोनतृतीयांश भरण्याच्या मार्गावर असताना, धरण्याच्या पायथा वीजगृहाच्या एका यंत्रणेतून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. लवकरच दुसरी यंत्रणा सुरू होण्याची शक्यता असून, तुलनेत कोयना शिवसागराचा जलसाठा अतिशय मजबूत स्थितीत आहे. अशीच अनेक मध्यम व मोठ्या धरणांची समाधानकारक स्थिती असून, बहुतेक छोटे जलसाठे भरून वाहताने नद्यांना पूर येण्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
