जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, जावली, पाटण, कराड या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पाटण, जावली, महाबळेश्वर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील सुमारे 800 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दरड प्रवण क्षेत्रातील डोंगरांमध्ये संरक्षक जाळी आणि कोटिंग अशा सुरक्षित उपाय योजनांचा प्रस्ताव मंजूर झाला असून पुढील वर्षभरात हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खाजगी शाळा, अंगणवाडी-बालवाडी, प्राथमिक शाळांना शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यातही पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील जावली, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई तालुक्यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या यांना शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे. महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यातील 800 कुटुंबांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. पाटण तालुक्यातील गतवर्षी पूर परिस्थितीने ग्रस्त झालेल्या गावांची पहिली सुरक्षित कॉलनी तयार होत असून सुमारे साडेपाचशे अद्ययावत घरे या निमित्ताने उभी राहणार आहेत. त्याची निविदा काढण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला पाऊस संपल्यानंतर सुरुवात होणार आहे.
दरडप्रवण क्षेत्रातील भागांमध्ये जेथे भूस्खलनाचा व कडे तुटण्याचा धोका जास्त आहे, अशा भागांचे सर्वेक्षण करून सुमारे 180 कोटीचा आराखडा सादर करण्यात आला होता. या ठिकाणी आवश्यक केल्याप्रमाणे डोंगर भागांचे कोटिंग करणे आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षित मजबूत जाळ्या बसवणे हे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम पुढील मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्र तसेच एन डी आर एफ टीम, शिवाय पाटण, जावली, कराड, सातारा व वाई तालुक्याच्या तहसीलदारांना अलर्ट मोड वर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी नागरिकांच्या स्थलांतराचे निर्देश दिले. महाबळेश्वर व पाटण तालुक्यामध्ये गेले दोन दिवस तब्बल वीस तास वीज नव्हती. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून कार्यकारी अभियंता आणि दुरुस्तीपथके ही महाबळेश्वर व पाटण या दोन तालुक्यांमध्ये मुक्कामी पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
कण्हेर धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उचलून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 75 टीएमसी वर पोहोचला असून दरवाज्यातून 11 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 24 तासात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला पडला असून तीनशे सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुफान पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गुरुवारी सकाळी 24 तासात कोयनानगर येथे 163, नवजा येथे 237 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरचा हा पाऊस या वर्षातील 24 तासातील उच्चांकी पाऊस ठरला आहे. गुरुवारी सकाळी कोयना धरणामध्ये 75 हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून त्यातून 1050 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातही धुवांधार पाऊस होत आहे. यामुळे पाटण या ठिकाणी कोयना नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात आहे. वाई तालुक्यातही जोरदार पावसामुळे वाई तालुका क्षेत्रात येणार्या जोर गावाचा इतर क्षेत्राशी पुलावरून पाणी गेल्यामुळे संबंध तुटला आहे. परिणामी सुरक्षिततेच्या दृष्टीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच महाबळेश्वर, पाचगणी या भागातील पर्यटन स्थळे आणि धबधबे सुरक्षितेच्या दृष्टीने बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
