अक्षरा आणि अधिपतीची थायलंडमधील धमाल-मस्ती प्रेक्षकांना ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या आगामी भागात पहा
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची टीम थायलंडला पोहोचली आहे. या मालिकेच्या पुढील भागात अक्षरा आणि अधिपती हे थायलंडमधील समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना प्रेक्षकांना दिसणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर एकाच व्हिडिओचा कल्ला सुरु आहे, तो म्हणजे अधिपती-अक्षराचा थायलंडमधील ‘कहो ना प्यार हैं’ गाण्याचा प्रोमो. जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला गेले आहेत.
हृषिकेश शेलारने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं, “माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं. ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली. मुंबईमध्ये आमची किमान 50-60 जणांची टीम असते. पण थायलंडला आम्ही 15-16 जणच होतो.”
“तिथे शूटिंगचं सगळं सांभाळणं ही एक वेगळीच तारेवरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड होतं. पण त्यात खूप मज्जा आली. अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं गाणं एका आयलँडवर शूट केलंय,” असं त्याने सांगितलं.
याविषयी तो पुढे म्हणाला, “त्याच आयलँडवर ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण झालं होतं. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. कारण आमच्याकडे एकच दिवस होता आणि तिथे जोरदार पाऊस पडत होता. पावसामुळे आम्हाला शूटिंग थांबवावी लागली. अखेर दोन तासांनंतर आम्ही शूटिंगला पुन्हा सुरुवात केली.”
