एसटी सेवा सुरू करा, अन्यथा याद राखा; माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा इशारा
सातारा : कोकणातून सातार्यात स्थायिक झालेल्या कोकणस्थ बांधवांसाठी सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नाने सातारा-रत्नागिरी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सातारा मध्यवर्ती आगार प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या बससेवेला फटका बसत आहे. सातार्यातून रत्नागिरी गाडीच्या तिकिटाचे आरक्षण केले असता प्रवाशांना उंब्रज अथवा कराड पर्यंत जाण्याचा विनाकारण मनस्ताप सोसावा लागत आहे. सातारा-रत्नागिरी बससेवा सुरळीत करा, या मार्गासाठी नवीन गाडी द्या, अन्यथा याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे.
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांचे अंतर सुमारे 120 किलोमीटर आहे. सातारा आगाराकडून कोरोनापूर्वीच्या काळामध्ये तब्बल 30 वर्षे सातारा-रत्नागिरी बससेवा सुरू होती. या सेवेचे सातारा आगाराला मिळणारे उत्पन्न दिवसाला 23 ते 25 हजार रुपये इतके होते. मात्र गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून ही बस सेवा सातत्याने तांत्रिक कारण देऊन खंडित केली जात आहे. मागील वर्षभरापासून माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा मध्यवर्ती आगाराचे विभाग नियंत्रण रोहन पलंगे यांच्याकडे पाठपुरावा करून ही बससेवा पुन्हा एकदा नव्याने सुरू केली. सातार्यात स्थायिक झालेल्या कोकणस्थ बांधवांना त्यानुषंगाने रत्नागिरीला जाण्यासाठी मोठी सोय उपलब्ध झाली होती. यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही दिवसांतच ही बस सेवा पुन्हा खंडित झाली आहे.
सध्या आगामी श्रावण महिना, गौरी गणपती हा कोकणस्थ बांधवांना आपल्या गावाचे वेध लागतात. हा गडबडीचा हंगाम लक्षात घेता सातारा-रत्नागिरी बससेवा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. सातारा आगाराकडून रत्नागिरी गाडीचे रिझर्वेशन घेतले जाते. मात्र त्यांना पंढरपूर गाडीत बसून देतो किंवा उंब्रज अथवा कराडला जाऊन तिथून बदली गाडी घ्यावी, अशा सूचना दिल्या जातात. त्यामुळे एकाच तिकिटाच्या पैशांमध्ये प्रवाशांना बदली बस करून जावे लागते आणि आर्थिक भुर्दंड पडतो तो वेगळाच. पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस सातारा कडून सोडण्यात आल्या होत्या. मात्र यात्रा संपूर्ण होण्यास आता सहा दिवस उरले आहेत. मात्र तरीही अद्याप सातारा- रत्नागिरी या मार्गासाठी बस उपलब्ध होत नाही. मग बस उपलब्धच नसताना सातारा-रत्नागिरी बसचे रिझर्वेशन का घेतले जाते ? याद्वारे प्रवाशांना नाहक मानसिक त्रासास सामोरे जावे लागत असून आर्थिक फटकाही बसत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी ही बिरुदावली मिरवताना प्रवाशांच्या सेवेचा तर विषयच नाही, मात्र त्यांना नाहक त्रास सातारा आगार का देत असावे? असा संतप्त सवाल येथील प्रवाशांनी विचारला आहे. या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा-रत्नागिरी बस सेवा नवीन गाडीसह सुरळीत करा, असा इशारा सातारा आगाराला दिला आहे. याचबरोबर बस सुरळीत न झाल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा त्यांनी आगार प्रमुखांना दिला आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या इशारा पत्रात नमूद आहे की, मी मूळचा कोकणातील असून जन्मभूमी रत्नागिरी आणि कर्मभूमी सातारा आहे येथील कोकणस्थ बांधवांना कोणी वाली नाही असे समजू नका. सातारा-रत्नागिरी बससेवा तातडीने सुरू करा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
