तिप्पट झाडे लावण्याचे निर्देश, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन ॲक्शन मोडवर
सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर (बफर झोन) क्षेत्रातील खाजगी मालकीच्या दोन भूखंडातील २८० झाडांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने तीन मिळकतदारांना एकूण अडीच लाख रुपये दंड ठोठावला. तोडलेल्या झाडांच्या तिप्पट संख्येने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत.
प्रशांत रमेश डागा (रा. यादोगोपाळ पेठ सातारा), श्यामसुंदर गोवर्धन भंडारी (रा. संपदा नगरी, सोमवार पेठ पुणे) व गणेश दिनकर भोसले (रा. मुनावळे) या मिळकतदारांना स्वतःच्या मिळकत क्षेत्रात बेकादेशीर बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी
वृक्ष अधिकारी तथा बामणोलीचे वनक्षेत्रपाल व्ही.डी. बाठे यांनी हा दंड केला आहे. बामणोली जवळ मुनावळे (ता.जावळी, जि.सातारा) हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रामध्ये मोडते. त्यामुळे ही बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.
यातील मिळकतदार प्रशांत डागा व श्यामसुंदर भंडारी यांनी एक ते सात जूनच्या दरम्यान मुनावळे गावात, स्वतःच्या भूखंडावरील झाडांची वन्यजीव विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता तोड केली होती. या दोघांनी मिळून २१० झाडे तोडली असल्याचे वन्यजीव विभागाच्या पंचनाम्यात निष्पन्न झाले. वनाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाब प्रशांत डागा यांनी ही तोड विनापरवाना केल्याची कबुली दिली होती. चौकशीअंती या दोघांना विनापरवाना तोडण्यात आलेल्या २१० झाड़ांसाठी, प्रत्येक झाडामागे १ हजार याप्रमाणे एकूण दोन लाख दहा हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच ६३० झाडांची चालू पावसाळ्यात लागवड करण्याचा आदेश देण्यात आला.
याच गावातील बेकायदेशीर वृक्षतोडीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गणेश भोसले यांनी स्वतःच्या मालकी क्षेत्रातील ७० झाडांची एक ते सात जून च्या दरम्यान याच पद्धतीने बेकायदेशीर वृक्षतोड केली. वनाधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात भोसले यांनीही बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा कबुली जबाब दिला आहे. त्यांना विनापरवाना तोडण्यात आलेल्या ७० झाडांसाठी, प्रती झाड ५०० रुपये प्रमाणे एकूण ३५ हजार रूपये दंड करण्यात आला. तसेच २१० झाडांची चालू पावसाळ्यात लागवड करण्याचा आदेश देण्यात आला.
दोन्ही मिळकती मधील तिन्ही मिळकतदारांना विनापरवाना तोडलेल्या झाडांच्या तिप्पट स्थानिक प्रजातींच्या झाडांची चालू पावसाळयामध्ये मालकी क्षेत्रात लागवड करावी. अन्यथा या झाडांची लागवड देखभाल व त्यांच्या वाढीच्या खर्चाची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास दर साल दर शेकडा सहा टक्के व्याजाने सर्व रक्कम वसूल करण्यात येईल, असेही वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
मुनावळे येथे घटनास्थळी शेवरी, वारस, चेर, जांभूळ, आळू, हिरडा, आटकी, आवळा, ऐन, चिंचोटा, सरशी, कुंभा, किंजळ, आसाना व आंबा अशा विविध जातीच्या झाडांची जमिनी पासून एक ते दीड मीटर उंचीवर तोड करण्यात आली. तोड केलेली बहूतेक झाड़े ही 15 ते 60 से.मी. वेढीमध्ये आहेत. त्याचबरोबर करवंद, घाणेरी, रामेटा, चिमट,धायटी व आबोळकी झुडपे व वेलींचीही तोड केल्याचे दिसून आले.
