सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध
सातारा : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवारी साताऱ्यात पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक यादरम्यान पडलेल्या खड्ड्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाचा निषेध म्हणून यावेळी खड्ड्यांच्या स्मृतिदिनानिमित्त शोकसभा घेण्यात आली आणि या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी केली.
डीपीआयच्या या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तातडीने खड्ड्यामध्ये मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यानच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती परंतु कोणतीच कार्यवाही न झाल्याने खड्ड्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सातारकरांचे लाडके खड्डे असे या आंदोलनाला नाव देण्यात आले. तसेच सातारकरांचे लक्ष वेधून घेणारे छोटे छोटे फलक या खड्ड्यांमध्ये लावण्यात आले होते यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची सदस्य अविनाश तुपे उद्धव गायकवाड संदीप दादा जाधव रियाज बागवान इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनाविषयी बोलताना ऋषिकेश गायकवाड म्हणाले साताऱ्यात सातारकरांना रस्त्याची चांगली सुविधा मिळावी आणि त्या रस्त्यांची मजबूत दुरुस्ती व्हावी या हेतूने हे आंदोलन करण्यात आले यापुढेही प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलने होत राहतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने रस्त्यावर मुरूम टाकून हे खड्डे बुजवले. मात्र सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचा राडा झाला होता.
