सातारा : महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण हा कायदा विधानसभा निवडणुकीपूर्वी अंमलात आणावा. महिलांवर अत्याचार वाढत असून याला केंद्र व राज्य शासनच जबाबदार आहे असा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी घोषणाबाजीही झाली.
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्या मार्गदशनाखाली ही निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्षा यादव म्हणाल्या, महिला काँग्रेसच्यावतीने नारी न्याय आंदोलन दिल्ली येथील जंतरमंतर येथे होत आहे. राज्यातील आताच्या विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची गरज आहे. तसेच ओबीसी, अनुसूचित जातीमधील महिलांनाही निवडणुकीत किती टक्के भागीदारी देण्यात येणार आहे हे स्पष्ट करावे. देशात आज महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. महिलांसाठी केलेले कायदे शासनाने अद्याप अंमलात आणलेले नाहीत. त्याची लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच आता झालेल्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात काँग्रेसच मोठा पक्ष ठरला आहे. सातारा जिल्ह्यातही पक्षाची ताकद वाढलेली आहे.
