सातारा : क्षेत्र महाबळेश्वर वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे दुपारी धोम (ता वाई) धरणातून 3622 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाटावर पाणी आले आहे. लगतच्या अनेक मंदिरामध्येही नदीचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरण 84 टक्के भरले आहे.
वाईच्या पश्चिम भागातील कृष्णा नदीवरील पहिले धरण बलकवडी(ता वाई) 85 टक्के भरले आहे. बलकवडी धरणातून कृष्णा नदी द्वारे 1298 क्युसेक्स पाणी धोम धरणात सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक चांगली असल्याने हा निर्णय घेण्यात आला. धरणातून वाईतील प्रसिद्ध महागणपती घाटावर पाणी आले आहे.धोम धरणातून आसरे बोगद्यातून 200 क्युसेक्स पाणी भोर,खंडाळा, फलटण साठी सोडण्यात आले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिला आहे.
