स्पेशल DG वरसुद्धा घेतली अॅक्शन
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. सीमा सुरक्षा दलाचे (BSF) डायरेक्टर जनरल नितिन अग्रवाल यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच बीएसएफचे स्पेशल डीजी वाय.बी. रुराानिया यांना पदावरुन काढून पुन्हा ओडिशा केडरमध्ये पाठवले आहे. नितीन अग्रवाल यांनाही त्यांचे मुळ केडर केरळमध्ये परत पाठवले आहे. गृहमंत्रालयाने या कारवाईला (वेळेपूर्वी परत पाठवणे) म्हटले आहे.
का केली गेली कारवाई :
मागील वर्षभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी सक्रीय झाले आहे. वर्षभरापासून सतत घुसखोरी होत आहे. त्यामुळेच सीमा सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल नितिन अग्रवाल आणि स्पेशल डीजी वाय.बी. रुराानिया यांच्यावर कारवाई झाल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मिरातील घुसखोरीमुळे सरकारने उचललेले हे सर्वात मोठे प्रशासकीय पाऊल आहे. सर्वोच्च अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच अशी कारवाई :
पंजाबच्या सीमावर्ती भागातून अतिरेक्यांची घुसखोरी वाढली होती. त्यावर नियंत्रण आणण्यात दोन्ही अधिकाऱ्यांना अपयश आले. यामुळे ही कारवाई झाली आहे. मागील अनेक वर्षांत प्रथमच सर्वोच्च अधिकाऱ्यांवर अशी कारवाई झाली आहे. भारतीय अर्धसैनिक दलाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. त्याच्या जागी लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
डीजी बीएसएफ नितिन अग्रवाल 1989 बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहे. तर खुरानिया 1990 बॅचचे ओडिशा केडरचे अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी मागील वर्षी जून महिन्यात सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली होती. खुरानिया विशेष महानिदेशक (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर असलेल्या सैनिकांचे नेतृत्व करत होते.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक हल्ले केले. त्या हल्ल्यांमध्ये भारताचे जवानही शहीद झाले. अतिरेकी सक्रीय झाल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. त्यानंतर तातडीने सरकारने पावले उचलत अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
