इस्रायलने बॉर्डर सील करुन डिफेंस सिस्टिम केली तैनात
इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांनी 48 तास आधी इस्रायलला विनाशाची वॉर्निंग दिलीय. अजून 24 तास बाकी आहेत. परिस्थिती गंभीर होत चाललीय. आखाती देशात कधीही युद्ध भडकू शकतं. इस्रायलने बॉर्डर सील करुन डिफेंस सिस्टिम तैनात केली आहे. अमेरिकेने सुद्धा इस्रायलसाठी सुरक्षा चक्र तयार केलय. हानियाच्या मृत्यूचा बदला घेणार अशी इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. इराणने हल्ला केला, तर नाटो इस्रायलच्या मदतीसाठी उतरु शकतं. याचा थेट अर्थ आखातामध्ये युद्ध असा होतो. यात फक्त आखातामध्येच नुकसान होणार नाही, तर रशिया, चीन उतरले तर हे युद्ध तिसऱ्या महायुद्धामध्ये बदलू शकतं.
अमेरिकेने इराणने ज्या दहशतवादी संघटना उभ्या केल्यात, त्यांच्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. अमेरिकेने 12 वॉरशिप तैनात केल्या आहेत. यात भूमध्य सागरात 4 युद्धनौका उभ्या आहेत. लेबनानमध्ये हिज्बुल्लाह, गाजामध्ये हमास, सीरिया आणि वेस्टबँकमध्ये इराणने इस्रायल विरोधात दहशतवादी गट उभे केले आहेत. हे सर्व प्रॉक्सी अमेरिकेच्या रडारवर आहेत. लाल सागरात हुतींचा हल्ला रोखण्यासाठी 4 युद्धनौका आहेत.
धर्म युद्धाकडे नेऊ शकतात
अमेरिका येमेनमध्ये हुती बंडखोरांना टार्गेट करत आहे. इराण किंवा त्यांच्या समर्थक दहशतवादी गटांनी इस्रायलवर हल्ला केला, तर अमेरिकेकडून एकाचवेळी अनेक आघाड्यांवर युद्धाला तोंड फुटेल. इराण-लेबनान या युद्धाला धर्म युद्धाकडे नेऊ शकतात. त्याआधीच अमेरिकेकडून कारवाई होईल. बायडेन आणि नेतन्याहू यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेची भूमिका बदलली आहे. बायडेन यांनी इस्रायलला संरक्षणाचा शब्द दिला आहे.
हल्ल्यासाठी शस्त्र तैनाती
“कुठल्याही परिस्थितीला तात्काळ उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. मग, ते संरक्षण असो किंवा आक्रमण. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही कुठलीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत” असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलची तयारी बघता, आखातामध्ये स्थिती बिघडत चालल्याच स्पष्ट होतं. इस्रायल-अमेरिकेने संरक्षणाची तयारी केली आहे, दुसऱ्याबाजूला हल्ल्यासाठी शस्त्र तैनाती सुरु आहे.
बेसवर एफ-16 वॉर रेडी
इस्रायलने बॉर्डर सील करुन हाय अलर्ट घोषित केला आहे. लॉन्ग रेंज मिसाइल आणि डिफेंस सिस्टमची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या रॉनल्ड रीगन युद्धनौकेवरुन F18 हॉर्नेटने युद्ध कसरती सुरु केल्या आहेत. इराक-सीरियामधील आपल्या बेसवर एफ-16 वॉर रेडी ठेवलं आहे. युद्धाची शक्यता लक्षात घेऊन, लुफ्थांसासह 11 एयरलाइन्सनी इस्रायलला जाणारी विमान रद्द केली आहेत. ईराणच्या बाजूने लेबनान, इराक, सीरिया, येमेन, वेस्टबँक, चीन, रशिया हे देश आहेत. इस्रायलसोबत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स त्याशिवाय काही नाटो देश आहेत.
