पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : सातारा शहरातील तेलीखड्डा येथील घरफोडीचा शहर पोलिसांनी उलगडा केला असून तिघा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. यातील एक चोरटा मिरजमधील असून दोघेजण सातारा शहरातील आहेत. तर विशेष म्हणजे या संशयितांनी दोन दुचाकींची चोरी केल्याचीही कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ जुलैला रात्रीच्या सुमारास सातारा शहरातील तेलीखड्डा येथे भरवस्तीमधील एका बंद घरात धाडसी चोरी करण्यात आली होती. चोरट्याने सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम, मोबाइल चोरुन नेला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला. यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी शहर पोलिसांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानंतर शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच काही संशयित तरुणांकडे चौकशी केली. त्यावेळी एका चोरट्याचे नाव समोर आले. शोध घेत असताना तो मिरजला गेल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथक मिरज गेले आणि त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे चौकशी केल्यावर साताऱ्यातील दोघांची नावे समोर आली. संबंधितांनी चोरी केल्याचेही कबुल केले.
पोलिसांनी याप्रकरणी रेहान अन्वर शेख (वय १९), मोबीन अलिम तांबोळी (वय २१, दोघेही रा. शनिवार पेठ सातारा) आणि अमनअली फैय्याजअली पठाण (वय १९, रा. मोमीनपुरा, म्हैसाळ रोड मिरज, जि. सांगली) यांनी अटक केली आहे. यातील दोघेजण सराईत चोरटे आहेत. संशयितांनी सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी केली असल्याचीही कबुली दिली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शाम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, सुनील मोहिते, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सायबर पोलिस ठाण्यातील महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
