सातारा : कोरोना काळात मृत झालेल्या शेकडो रुग्णांना जिवंत दाखवून त्या आधारे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी धाड टाकली आहे.
ईडीच्या झोन-२ मुंबई कार्यालयातून हे अधिकारी सकाळी सात वाजता अचानक घरी धडकले. दोन उच्च अधिकारी व त्यांच्यासोबत २२ सीआरपीएफच्या जवानांनी घरावर धाड टाकली.
धक्कादायक बाब म्हणजे, दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख हे घरातच नाहीत. घरात फक्त महिला, लहान मुले व दोन जेष्ठ नागरिक घरात आहेत. या महिला व लहान मुलांवर ईडीचे अधिकारी माहिती घेत आहेत.
देशमुख कुटुंबियांचे मायणी नजिकच्या शिंदेवाडी (ता.खटाव) येथे घर आहे. येथे ही धाड टाकण्यात आली आहे.
या घराशेजारीच देशमुख कुटुंबाची दुध डेअरी आहे. या डेअरीतील कर्मचाऱ्याना बोलावून ईडीचे अधिकारी चौकशी करीत असल्याचे देशमुख कुटुंबीयांच्या सूत्रांनी सांगितले.
देशमुख कुटुंबातील प्रमुख डॉ. एम. आर. देशमुख यांनी सामाजिक हेतूने मायणी येथे वैद्यकीय महाविदयालय सुरु केले आहे. हे महाविद्यालय माण -खटावचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाच वर्षांपूर्वी ताब्यात घेतले होते.
सर्वोच्च न्यायालयाने हे महाविद्यालय देशमुख कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मात्र त्या अगोदर साधारण तीन वर्षे हे महाविद्यालय आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यात होते. कोरोना काळात त्यांनी अनेक गैरप्रकार केले होते. पहिला गैरप्रकार त्यांनी एका दलित शेतकऱ्याच्या खोट्या सह्या करून त्याच्या शेतातून रस्ता काढला होता. त्यावरून जयकुमार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गोरे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर गोरे यांना संरक्षण मिळाले होते.
महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. एम.आर. देशमुख व त्यांचे भाऊ आप्पासाहेब देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. हे दोन्ही बंधू अजून तुरुंगातच आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेचे कोरोनातील प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले. तेव्हापासून हे महाविद्यालय आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या कारवाईतून काय माहिती उपलब्ध झाली, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध झाली नव्हती.
