पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आणि मनु भाकरसाठी वाईट बातमी आली आहे. नेमबाज मनु भाकर हीची सलग 3 पदक मिळवून हॅटट्रिक करण्याची संधी हुकली आहे. मनु भाकर हीने शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी 25 मीटर पिस्तूल इवेंट प्रकारात फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे भारताला आणि स्वत: मनुला आज 3 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या पदकाची आशा होती. या 25 मीटर पिस्तूल इवेंट प्रकारातील आज अंतिम सामना पार पडला. या महामुकाबल्यात मनुचं पदकाचं स्वप्न भंग झालं आहे. मनुचं पदक हे अवघ्या 1 स्थानाने हुकलं आहे. मनुचं आव्हान हे चौथ्या स्थानी संपुष्टात आलं. त्यामुळे मनुला अपयश आलं. मनुने याआधी 1 वैयक्तिक आणि 1 मिश्र दुहेरीत पदक मिळवलं होतं. त्यामुळे मनुकडून पदकाचा रंग बदलण्याची आशा होती. मात्र तसं झालं नाही.
मनुला या प्रकारातील अंतिम सामन्यात एकूण 28 गुणांसह चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. मनू मेडलपासून फक्त 1 स्थानाने दूर राहिली. मनुने तिसऱ्या स्थान पटकावलं असतं तर ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक करत ब्रॉन्ज मेडल मिळवण्यात यशस्वी ठरली असती. मात्र मनुची संधी थोडक्यात हुकली. साऱ्या भारतीयांचं लक्ष हे मनुच्या कामगिरीकडे होतं. मात्र मनुला भारतीयांच्या अपेक्षेनुसार पदक जिंकून देता आलं नाही. मनुचं यासह पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
सुवर्ण पदक कुणाला?
दक्षिण कोरियाची जिन यांग ही नंबर 1 ठरली. यांग हीने सुवर्ण कामगिरी केली. यांगने 37 गुणांची कमाई केली. तर फ्रान्सनच्या केमीली जेद्रजेजेव्स्की हीने रौप्य पदक मिळवलं. तिनेही 37 गुण मिळवले. तर हंगेरीची वरोनिका मेजर ही ब्रॉन्झ मेडल मिळवण्यात यशस्वी ठरली. वरोनिका मेजर हील पहिल्या दोघींच्या तुलनेत 6 गुण कमी मिळाले. वरोनिकाने 31 गुणांची कमाई केली. तर आपल्या मनुला 28 गुण मिळाले.
मनुची हॅटट्रिक हुकली
भारताच्या खात्यात 3 मेडल्स
दरम्यान मनुने नेमबाजीत वैयक्तिक आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारात प्रत्येकी 1-1 असे एकूण 2 पदकं मिळवली. मनुने महिला एकेरी 10 मी पिस्तुल प्रकारात कांस्य पदक मिळवलं. भारताचं हे पहिलंवहिलं पदक ठरलं. तर त्यानंतर सरबज्योत सिंह याच्यासह 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र दुहेरी प्रकारातही ब्रॉन्ज मेडल मिळवलं. तर त्यानंतर कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे यानेही कांस्य पदकाची कमाई केली. भारताला आतापर्यंत नेमबाजीतूनच तिन्ही मेडल्स मिळाली आहेत.
