आनेवाडी टोल नाका काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखला, भर पावसात प्रचंड घोषणाबाजी
सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर भर पावसात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 कार्यकर्त्यांनी टोलनाका रोखो आंदोलन करत टोल भरू देण्यास प्रतिबंध केला. रस्ताच नाही जाग्यावर तर टोल का भरायचा? असा रोखठोक सवाल करत वाहने टोल शिवाय जाऊ देण्यास प्रारंभ केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टोल नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास आंदोलन केले. टोल नाक्यावर सुमारे पंधरा मिनिटे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतले.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावर काँग्रेसने आज मोर्चे बांधणी करत जोरदार आंदोलन केले. काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार पृथ्वीराज चव्हाण तर आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे 200 हून अधिक आंदोलन सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आनेवाडी टोलनाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. साडेनऊच्या दरम्यान डॉक्टर सुरेश जाधव आणि त्यांचे सहकारी रस्ताच नाही जागेवर टोल का भरायचा? असे फलक घेऊन टोलनाका परिसरात अवतरले. आणि रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असताना घेतला जाणारा टोल ही सक्तीची वसुली आहे, असा आरोप डॉक्टर सुरेश जाधव यांनी केला. त्यांनी व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना टोल वसुली प्रतिबंध केला त्यामुळे थोडा वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरच ठाण मांडत वाहने टोल शिवाय जाऊ दिली त्यामुळे वाहन चालकांचा चांगला फायदा झाला.
मात्र काँग्रेसच्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन लक्षात घेता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तरीसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची तमा न बाळगता आपल्या आंदोलन सुरूच ठेवले. डॉक्टर सुरेश जाधव म्हणाले राज्य सरकार सामान्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. राज्यात महागाई वाढलेली असताना पायाभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पुणे-बेंगलोर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शेंद्रे ते कागल हा रस्ता अद्याप सहा पदरीकरणाच्या निमित्ताने पूर्ण झालेला नाही. रिलायन्स इन्फ्रा या कंपनीकडून या कामांमध्ये वारंवार टोलवाटोलवी केली जात आहे. मग असे असताना सातारकरांना सक्तीचा टोल का भरावा लागत आहे. याचा कुठेतरी जाब विचारलाच पाहिजे, म्हणून काँग्रेसचे आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. भर पावसामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली. दुपारनंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे टोल नाक्यावर दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा टोल नाक्यावर आंदोलन करत पुन्हा एकद जोपर्यंत रस्त्याच्या सुविधा मिळत नाही तोपर्यंत टोल भरू देणार नाही अशी भूमिका घेतली. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक प्रकाश गवळी यांच्या संघटनेने सुद्धा टोल नाक्यावर आंदोलन करत वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसेल तर टोल का भरायचा? असा प्रश्न त्यांनी केला. एका दिवसात टोल नाक्याच्या संदर्भात तीन संघटनांचे वेगवेगळ्या आंदोलन झाल्याने खरोखरच टोल वसुली ही चर्चेत आली आहे.
