सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांचे सातारा येथे प्रतिपादन
सातारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Demokratir Annabhau Sathe) यांचे व्यक्तित्व आणि कारकीर्द सदैव प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित आणि शोषित समाजासाठी अखंड कार्य केले. ज्या समाजासाठी त्यांनी काम केले, त्या उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) सातत्याने त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे प्रश्न सोडवेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम (Amitdada Kadam) यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने राज्यस्तरीय ब्रास बँड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी, प्रदेश संघटक दत्ता आव्हाड, शिवाजीराव महाडिक, प्रमोद शिंदे, अशोकराव जाधव, राजेंद्र लवंगारे, सीमा जाधव, साधू चिकणे, निलेश कुलकर्णी, राजेश वाठारकर, सचिन बेलागडे, बाळासाहेब जाधव, सुभाष आडागळे, हरीश भाई आल्हाट, विठ्ठल माने, वैद्यकीय मदत सहायता कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगांवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सातत्याने तळागाळातील वंचित समाजासाठी कार्यरत राहिली आहे. त्यांचे प्रश्न सोडवणे हाच पक्षाचा पहिला अजेंडा आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांचे पोवाडे हे लोकबोधक आणि प्रेरक होते. त्यांनी वंचितांच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य झोकून दिले. त्यांच्या या लोकचरित्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सुद्धा वंचित घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच लोककलाकार आणि वादक यांच्या मागण्या शासन पातळीवर पोहोचवून त्यांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही अमित कदम यांनी दिली.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तित्व नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी सुरू केलेले कार्य आपण सर्वांनी पुढे सुरू ठेवूयात, हेच त्यांना जयंती निमित्त अभिवादन ठरेल.
राष्ट्रवादी पश्चिम प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी म्हणाले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी पक्षातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
