भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची टीका
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणाला (Politics) सभ्यतेची एक परंपरा आहे. या परंपरेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये अजिबात शोभत नाहीत. एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी राहील, या वक्तव्याने त्यांचे नैराश्य समोर आले आहे, अशी कडवट टीका भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी पत्रकार परिषदेत केली. बजेट (Budget) जर समजत नसेल तर विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पुस्तक वाचावे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये माधव भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतुदी आहेत याचा आढावा घेत माहिती दिली. केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून अफवा पसरवण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे, असे ते म्हणाले. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या निधीचा थांगपत्ता न लागल्यामुळे, विरोधकांनी सुरू केलेल्या शेरेबाजीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयी अज्ञान उघडे पडले आहे. आपल्याला अर्थसंकल्पातले कळत नाही, अशी जाहीर कबुली मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांचे हे अज्ञान उघड झाले आहे. अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे, असा उपरोधिक सल्ला माधव भंडारी यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भाने एक तर तुम्ही तरी राहाल नाहीतर मी तरी राहील, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या वक्तव्याची गंभीर दखल भंडारी यांनी घेत थेट महाभारतातील शिशुपाल आणि श्रीकृष्णाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, शिशुपाल आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये असेच वाक्युध्द झाले होते. मात्र सरते शेवटी शिशुपालाचा वध होऊन श्रीकृष्णाचे अस्तित्व राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परंपरेला प्रगल्भता आहे. विरोधाच्या राजकारणाला सुद्धा एक उंची आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे एकेरी वक्तव्य महाराष्ट्राच्या परंपरेला अजिबात शोभत नाही. महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने त्यांच्या वक्तव्याची निश्चितच दखल घेतलेली आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येईल, अशी थेट टीका त्यांनी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही, असा विरोधी सूर काहीजणांनी लावला आहे. काही माध्यमांनी त्या सुरामध्ये सुर मिसळला आहे. अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याविषयीच्या अज्ञानातून किंवा राजकारणातून हे घडू शकते. मात्र या नेत्यांनी अफवा पसरवण्या आधी अर्थसंकल्पाचे वाचन करावे किंवा जाणकारांकडून समजून घ्यावा, असा सल्ला माधव भंडारी यांनी दिला.
