नाशिक : मालेगावमध्ये गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ तरुणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे थरारक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाचवण्यात आले आहे. काल दुपारपासून हे लोक गिरणा नदीच्या पात्रात अडकले होते. या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचं हेलिकॉप्टर सज्ज झालं होतं आणि यशस्वीरित्या त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात आलं आहे.
मासे पकडताना अचानक पाण्याचा विसर्ग वाढला :
गिरणा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या या तरुणांना अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्राच्या मधोमध थांबावे लागले. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणात देखील जवळपास ८० टक्के इतका पाणीसाठा झाला असून गंगापूर धरणातून गोदावरीत सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय.
बचाव कार्यात अडचणी :
काल पाण्याचा मोठा प्रवाह तसेच रात्रीची वेळ यामुळे बचाव कार्यास मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे आज लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे लोकांना वाचवण्यात आलं आहे. हे लोक धुळे व मालेगावमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या वाचवण्यानंतर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि अशा घटनांचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यकतेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
