भ्रष्टाचाराविरोधात दि. 16 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा
सातारा : समाजामध्ये होणार्या अन्यायाविरोधात नेहमीच एल्गार पुकारणारी बहुजन मुक्ती पार्टी आगामी काळात फलटण विधानसभा ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी तुषार मोतलिंग यांनी केले आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दि. 16 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सातारा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वरील प्रतिपादन केले. या बैठकीवेळी बहुजन मुक्ती पार्टी मध्ये ज्योस्त्ना सरतापे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्याबद्दल त्यांची महिला सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याचवेळी वाई मधील संदीप कांबळे यांची युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाली तसेच कैलास पवार यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष व सुनील कांबळे यांची महाबळेश्वर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तुषार मोतलिंग यांनी सांगितले की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जी भरती केली होती, त्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी चा कोटा बिंदू नामावली प्रमाणे न भरता पैसे घेऊन मनमानी पद्धतीने भरती केलेली आहे. हराळे चौकशी समिती समोर डॉ. महेश खलिपे यांनी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. राधाकिशन पवार, डॉ. महेश खलिपे, अनामिका घाडगे यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच सचिन कांबळे (स्टेनो) मागासवर्गीय असल्याने त्यांना डावलून जितेंद्र देसाई गेली 13 वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बेकायदेशीरित्या स्वीय सहायक (शिपाई मधून पदोन्नती) म्हणून काम करत असल्याने मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे तसेच भ्रष्टाचारही वाढला आहे त्याची हकालपट्टी करावी. अन्यथा 16 ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करणार आहोत, असा इशाराही मोतलिंग यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेश प्रभारी प्रताप पाटील, प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ, सचिन बनसोडे, सुनील जाधव, तुषार मोतलिंग, अजित नलावडे, ज्योस्त्ना सरतापे, शिवराज झेंडे, भुषण गायकवाड, संदीप आवडे, संजय रुद्राक्ष, अमित कांबळे, हेमंत ठोंबरे, प्रमोद काळे, सुनील कांबळे, भरत ठोंबरे, सतेश गायकवाड, पोपट माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
