सातारा : सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण, कृषी, सहकारी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे केंद्रस्थान असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेप्रमाणे बँकिंग सेवेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी अथकपणे सात दशकाहून अधिक काळ कृषी सहकारी सेवेचे उत्तम व गुणात्मक कार्य केलेले आहे. उधारेदात्मनात्मनम: हे ब्रीद अंगीकारल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच स्वत:चा विकास हे सूत्र जिल्हा बँकेमुळे यशस्वी झाले आहे.
सातारा जिल्हा बँकेने वित्त पुरवठ्याबरोबरच सर्व प्रकारचे कृषी मार्गदर्शन, सहकार्य व जिल्ह्याच्या ग्रामीण कृषी विकासाला व सहकाराला दिशा देणेचे महत्तम कार्य केल्यामुळेच आज बँकेचा कार्यलौकिक देशभर झालेला आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2023 पासून बँकेचे अमृत महोत्सव वर्ष सुरू झाले आहे. दिनांक 15-08-2023 ते दिनांक 15-08-2024 या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अमृतमहोत्सव वर्षात बँकेच्या सभासद संस्था, शेतकरी आणि ग्राहकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबरोबरच काही सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या अनुषंगाने बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ देशाचे गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांचे उपस्थितीत करणेचा बँकेच्या संचालक मंडळाचा मानस असून या अनुषंगाने बँकेचे जेष्ठ संचालक आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. अजितदादा पवार यांचे माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाच्या नियोजित कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. याप्रसंगी नितीन काका पाटील यांनी बँकेच्या 75 वर्षाचा प्रगतीपर कामकाजाचा लेखाजोखा अमित शहा यांचे पुढे मांडला आणि बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी उपस्थित राहणार असलेचे सांगितले. यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वंकष कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच केंद्र शासन, नाबार्ड व सहकार विभाग
यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण होत असलेल्या सोसायटी संगणकीकरण प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे, खा. प्रफुलभाई पटेल उपस्थित होते.
आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. मकरंद पाटील यांनी यापूर्वीही बँकेच्या अडीअडचणी संदर्भात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
