भर पावसामध्ये खातेदार उपोषणाला रस्त्यावर
सातारा : गेल्या 23 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्या तारळी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू झाले. श्रमिक मुक्तिदल समतावादी संघटनेचे डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये शंभरहून अधिक खातेदार सहभागी झाले आहेत.
संकलन रजिस्टर अद्ययावत न होणे, गावठाणाच्या सुविधा न मिळणे, बोगस लाभार्थ्यांकडून जमिनीचे परस्पर ग्रहण केले जाणे, अशा विविध तक्रारी तारळी प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. या संदर्भात डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात बैठक लावण्याची मागणी केली होती. जिल्हा पुनर्वसन विभागाने या बैठकीबाबत कानाडोळा केला. या घटनांच्या निषेधार्थ डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी खातेदारांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान खातेदार ग्रामस्थ यांनी पन्हाळकर यांच्या उपस्थितीत शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून सर्व ग्रामस्थ मोर्चाने चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर आले.
या मागण्या संदर्भात जोपर्यंत प्रशासन न्याय्य भूमिका घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे पन्हाळकर यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तारळी प्रकल्पग्रस्तांच्या कराड, पाटण, माण, खटाव या तालुक्यातील जमिनी याच प्रकल्पाला मिळाव्यात. अन्य कोणत्याही प्रकल्पाला या जमिनी हस्तांतरीत होऊ नयेत, अशी या खातेदारांची मूळ मागणी आहे. मात्र शासन या संवेदनशील मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी केला आहे.
