आमदार जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, जातिवंत असाल तर मैदानात या : रामराजे यांना खुले आव्हान
सातारा : मायणी मेडिकल कॉलेजच्या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. विरोधकांच्या माध्यमातून या गोष्टीचे उगाच भांडवल केले जात आहे. मायणी मेडिकल कॉलेजच्या आर्थिक व्यवहाराचा लॉगिन आयडी संदीप देशमुख यांचा आहे त्या आर्थिक व्यवहारात संदर्भात त्यांची प्रवर्तन संचालनालयाने चौकशी केली. त्यामध्ये माझा काय संबंध ? असा सवाल माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, निलेश नलावडे, जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजी शिंदे इत्यादी उपस्थित होते. गोरे यांनी यावेळी अनेक कागदोपत्री पुरावे पत्रकारांच्या समोर सादर केले.
गोरे पुढे म्हणाले, एखाद्या आर्थिक गैरव्यवहारात ईडीने संदीप देशमुख यांची चौकशी केली असेल. त्यामध्ये विनाकारण माझे नाव गोवले जात आहे. त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मायणी मेडिकल कॉलेज हे देशमुख यांचे नाही, तर कॉलेज ट्रस्टचे आहे. हे सर्व प्रसार माध्यमांनी एकदा लख्खपणे लक्षात ठेवावे. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात जो आरोप होत आहे त्याचा थेट संबंध संदीप देशमुख यांच्याशी आहे. त्यासंदर्भात जर त्यांची आर्थिक निकषावर चौकशी केली असेल तर यामध्ये माझा कोणताही हात नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक उगाचच या प्रकरणाचे भांडवल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाचे बोलवते धनी कोण आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. या प्रकरणात कोर्ट जो आदेश करेल तो मान्य आहे. आमदार गोरे यांना सुद्धा याच पद्धतीने पाच वर्षांपूर्वी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. रामराजे तुम्ही जातीवंत म्हणवत असाल तर समोरासमोर या, मैदानात लढा. दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून फैरी झाडू नका. तुम्ही माढ्यात काय झाले म्हणून बोलता. तुमच्या फलटण तालुक्यात काय घडत आहे ते बघा. मतांची टक्केवारी घसरली आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर माणमधून लढा. महायुतीत आहात म्हणता आणि विरोधात काम करता. अजित दादांकडे जाता आणि शरद पवारांच्या चमच्याने पाणी पिता, अशा शेलक्या शब्दात गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे यांच्यावर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे कधीही झुकणार नाही, आता थेट इशारा देत जयकुमार गोरे म्हणाले, पवारांच्या पुढे सगळे राजकारणी झुकत असतील मी झुकणार नाही. मागे सुद्धा शरद पवारांनी माझ्यावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून प्रयत्न केले. मी स्वाभिमानी आहे. जनतेची कामे करतो, माझी समाजाची नाळ आहे. मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. खटाव आणि माण तालुक्यातला मराठा व ओबीसी समाज माझ्यासमोर आहे. कोणी किती चाली खेळल्या तरी शरद पवारांच्या पुढे मी झुकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
