सातारा शहर पोलिसांची कारवाई
सातारा : सातार्यातील पोलिस मुख्यालय परिसरात असणार्या दर्ग्यातील दानपेटी फोडून चोरी करणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. संशयित तीन चोरटे सातार्यातील असून शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
आकीब कासीम नांदवळकर (वय 30, रा. बुधवार नाका), शाहरूख नैशाद खान (वय 30, रा. सोमवार पेठ), शाहरूख शमशुद्दीन पठाण (वय 25, रा. शनिवार पेठ, सर्व सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 जुलै रोजी सातारा शहरातील मल्हारपेठ येथे असलेल्या दर्गामध्ये अज्ञात चोरटयांनी तेथील दानपेटी उचकटून त्यातील रोख रक्कम चोरून नेली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे (डीबी) पोलिस संशयितांची माहिती घेत होते. गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयितांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी संशयितांकडे चोरी केलेल्या रकमेची माहिती विचारल्यानंतर त्यांनी पोलिसांना चोरीची रक्कम दिली. त्यानुसार पोलिसांनी रोख 5000 रुपये जप्त केले. पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, सुनील मोहिते, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
