Explore

Search

April 13, 2025 11:12 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : वर्गणीच्या नावाखाली खंडणीचा सातार्‍यात नवा फंडा

व्यापारी बेजार; खंडणी बहाद्दरांना आवर घालण्याच्या मागणीला जोर

(विनित जवळकर)

सातारा : आगामी दहिहंडी, गणेशोत्सव या सणांचे कारण सांगून व्यापार्‍यांकडून वर्गणीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसेरुपी खंडणी उकळणार्‍या खंडणी बहाद्दरांना आवर घालण्याची मागणी सातार्‍यातील व्यापारी करीत आहेत. त्यांच्या या मागणीची दखल घेवून जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाने त्यासंबंधी आदेश काढावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सातारा शहरात अठरापगड जातीधर्माचे नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांचे सर्वच सण मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरे केले जातात. या सणावारांचे एक धार्मिक महत्त्व आहे. मात्र, आता या सणांमधील धार्मिकतेला गालबोट लावण्याचे काम काही अती उत्साही लोक करताना दिसत आहेत. सणांमध्ये पारंपारिक वाद्यांना फाटा देवून आता डीजे चा जमाना आला आहे. सातारा हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात असताना येथील वृद्धांच्या आरोग्याची काळजी न करता मोठमोठ्या आवाजात डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटाने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
या डीजे आणि डॉल्बीसाठी व्यापार्‍यांकडून वर्गणीच्या नावाखाली आडपडद्याने खंडणीच उकळण्याचा प्रकार सध्या दिसून येत आहे. त्यातच दरवर्षी नवीन मंडळे, पक्षीय प्रतिनिधी, विविध संघटनांच्या माध्यमातून व्यापारीवर्गाची अक्षरश: आर्थिक पिळवणूक होत आहे. मागच्या वर्षी तुम्ही एवढे दिले होते, आता एवढे द्या… अशी एकप्रकारे धमकीच त्यांना दिली जाते. यामध्ये जास्त प्रमाणात रेस्टॉरंट, ढाबे, मद्यविक्रेते, कापड व्यावसायिक भरडले जातात. हे व्यापारी काही टक्क्यांमध्ये आपला व्यवसाय करीत असताना त्यांच्याकडून तर मोठमोठ्या रकमांची मागणी केली जाते. नाही वर्गणीरुपी खंडणी दिली तर तू इथे धंदाच कसा करतोस, ते बघतो… असा सज्जड दमच त्यांना भरला जातो. धंदा तर करायचाय, त्यातून दुकानातील माल या लोकांपासून वाचवणे गरजेचे… त्यामुळेच हे व्यावसायिक समोरच्याच्या धमकीला घाबरुन दादा, असे करु नका, आत्ता एवढे घ्या, नंतर बाकीचे देतो, असे सांगत आपल्या पाठीमागचा ससेमिरा चुकवित आहेत. त्यातही एक गेला की दुसरा उभा राहतो. त्याला एवढे दिले, मला एवढे द्या, असे म्हणत तोही तोच कित्ता गिरवतो. अशा कितीतरी मंडळांना या व्यापार्‍यांना वर्गणीरुपी खंडण्या द्याव्या लागतात. यामुळे धंदा करावा की या लोकांच्याच तुंबड्या भरत बसावे? या विवंचनेत सातार्‍यातील व्यापारी आहेत.
या त्रासातून कोणीतरी सोडवावे, याची प्रतिक्षा हे व्यापारी करत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने यासंबंधी वेळीच कठोर आदेश काढून वर्गणीच्या नावाखाली व्यापार्‍यांची अक्षरश: लूट करणार्‍या खंडणीबहाद्दरांना चाप लावावा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy