Explore

Search

April 14, 2025 12:16 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Koyna Dam : कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग बंद

सातारा : कोयना धरण  पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, सलग पाऊस पडत नाही. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर सोमवारी दुपारी करण्यात आला होता. त्यात आणखी कपात करुन तो विसर्ग सोमवारी रात्री आठ वाजता २० हजार क्युसेकवर आणण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी आठ वाजता पाण्याचा धरणाच्या दरवाजातून करण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातून फक्त पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलैला धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युसेक सोडण्यात आले. त्यानंतर २६ जुलैला त्या विसर्गात वाढ करुन ३० हजार क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो वाढवून ३० जुलैला ४० हजार तर एक ऑगस्टला पुन्हा ५० हजार विसर्ग सुरु करण्यात आला होता.

त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून पुराचा धोका निर्माण झाला होता. गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो सोमवारी दुपारी ४० हजारवर आणण्यात आला. त्यानंतर सोमवारी रात्री तो २० हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेला दोन हजार १०० क्युसेक असा २१ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु होता.

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला ५३, नवजाला ९४ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होवू लागली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy