मानेगाव : आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे देशभक्त संस्था पुरस्कार २०२४ हा देऊन स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या मानेगावातील स्वातंत्र्यसैनिक स्व. रघुनाथ मोरे युवा प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला. इस्लामपूर मधील राजमनी हॉल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक, वक्ते प्रा. जगदीश ओहोळ होते. या सोबत नंदकुमार हात्तीकर, प्रकाश शेंडगे, अनिकेत बनसोडे, श्रद्धा शिंदे, अमन पटेल हे मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेतलेल्या क्रांतीकारकांची आठवण जिवंत रहावी. त्यांनी केलेला संघर्ष हा विविध सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थी तसेच समाजातील युवा वर्गापर्यंत पोहचवण्याचे काम सलग अकरा वर्ष मोरे प्रतिष्ठान करत आहे. या कामाच्या आढावा घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा यिन चे माजी मुख्यमंत्री अनिकेत मोरे आणि पदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अनिकेत मोरे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेले हे प्रतिष्ठान येत्या काळात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांना एकत्रित करून त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडून करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या चळवळीत स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आणि प्रास्ताविक आशीर्वाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद बल्लाळ यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत पाटोळे यांनी केले, तर आभार ऋत्विक पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती.
