मुस्लीम देशांना इराणची धमकी
तेहरान : इराण आणि इस्रायलवर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. इराणकडून कधीही इस्रायलवर हल्ला होऊ शकतो. या हल्ल्याबाबत अमेरिकेने देखील इस्रायलला सतर्क केले आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर इराण अधिक संतप्त झाला आहे. कारण इराणमध्ये असताना हनियाची हत्या करण्यात आली आणि या हत्येमागे इस्रायलचाच हात असल्याचा इराणचा दावा आहे. इराणने इस्रायलकडून बदला घेणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. या हल्ल्याच्या शक्यतेमुळे इस्रायल आधीच सतर्क आहे. मध्यपूर्वेतही सध्या तणावाचे वातावरण असताना इराणने मुस्लीम देशांनाच इशारा दिला आहे. इजिप्तने आपल्या विमान कंपन्यांना इराणच्या हद्दीतून उड्डाण न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जॉर्डननेही अलर्ट जारी केला आहे. विमानांमध्ये ४५ मिनिटे अतिरिक्त इंधन ठेवण्यास सांगितले आहे. बुधवारी सौदी अरेबियात इस्लामिक सहकार्य संघटनेच्या देशांची बैठक झाल्याची देखील माहिती आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत इराणने मुस्लीम देशांना धमकी दिलीये. की जर कोणत्याही देशाने इस्रायलवर हल्ला करण्यापासून आम्हाला थांबवले तर इराण त्याच्यावरही कारवाई करेल.
सौदी अरेबियात झालेल्या बैठकीत इराणने इतर देशांना या युद्धापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. कोणी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर इराण त्यांच्यावर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. तेहरानमध्ये हमास प्रमुखाच्या हत्येने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. जे आम्ही खपवून घेणार नाही. जे देश शांतपणे इस्रायलचे समर्थन करतात त्यांना हा इशारा होता. एप्रिलमध्ये इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. त्यावेळी इस्रायलने अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने हा हल्ला हाणून पाडला होता. जॉर्डन आणि सौदी अरेबियानेही इस्रायलला तेव्हा मदत केली होती.
हमास प्रमुख इस्माइल हनिया इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी तेहरानला आला होता. तो इराणचा पाहुणा होता. त्यामुळेच त्याची हत्या इराणच्या जिव्हारी लागली आहे. या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचं इराणचं म्हणणं आहे. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तेहराणमध्ये ज्या गेस्ट हाऊसमध्ये हनिया थांबला होता. त्या खोलीला लक्ष्य करत स्फोट घडवण्यात आला. ज्यामध्ये हनिया आणि त्याच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला. हा हल्ला मिसाईलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला आहे.
