वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
पाटण : पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे.
मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली आहे. वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पाटण वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या वाल्मीक रस्त्यावर लोकांना वाघाचे दर्शन झाले. तेथील गणेश भालेकर यांनी त्याचा व्हिडिओ काढला. तोपर्यंत वाघाने नजीकच्या रानात धूम ठोकली. वाघाचे जवळून दर्शन झाल्याची घटना घडल्याने येथील शेतकरी घाबरले आहेत. धजगांव गावची लोकसंख्या ४०२ च्या आसपास असून वाल्मीक डोंगर पठारावर हे गाव वसले आहे.
बुधवारी रात्री शिंदेवाडी धजगांव रस्त्यावरील झुडपात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. एका बाजूला वाघ आणि दुसऱ्या बाजूला बिबट्या असल्याने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तीन गायी, एक वासरू तर कुणाच्या शेळ्या या वाघाच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे जनावरे चारण्यासाठी शेतकरी शेतात जाण्यास धजवत नाहीत.
पाटण तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. मात्र, या प्राण्यांचा अधिवास असल्यास पूर्ण अन्नसाखळी अर्थात पर्यावरण समृद्ध असल्याचे मानले जाते. वाघाचे दर्शन झाल्याने वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. डोंगर कपारीत वसलेले या गावात वाघाचे धुमाकूळ सुरु आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. दिवसाढवळ्या पट्टेरी वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली आहे. वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
मल्हारपेठ वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक हे गुरुवारी दुपारी त्या ठिकाणी जाऊन ज्यांनी हा व्हिडिओ काढला आहे, त्यांच्याकडून खातरजमा आणि चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झाल्यावर पंचनामा होवून लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कामाबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
–दिलीप धडाम, ग्रामस्थ धजगाव
