लोणंद : वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघामध्ये घराणेशाही सुरू आहे. आमदार आमच्याच घरातला, साखर कारखान्याचा आणि जिल्हा बँकेचा अध्यक्षही आमच्या घरातलाच, आता आलीच संधी तर राज्यसभेची खासदारकीही आमच्याच घरात, अशी घराणेशाही येथे सुरू आहे. त्यामुळे खरंच हिंमत असेल, तर राज्यसभेची उमेदवारी मतदारसंघातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला देऊन दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी आमदार मकरंद पाटील यांना पत्रकाद्वारे दिले आहे.
डॉ. सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा मानला जातो. (कै.) यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत पाठवण्यासाठी (कै.) किसन वीर आबांनी मैत्रीची एक अविस्मरणीय अशी भेट दिली. स्वतःच्या सातारा लोकसभेच्या जागेवर चव्हाण साहेबांना उभे करून त्यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवले आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. राजकारणात सुद्धा मोठं मन असणारी ही मोठी माणसं हा सातारा जिल्ह्याचा खरा वारसा आहे.
आज मात्र या जिल्ह्यात पूर्णतः विपरीत परिस्थिती झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा दौऱ्यात राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला देऊ केली आहे आणि त्या जागेवर नितीन पाटील यांना पाठवले जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. वर्तमानपत्रांमध्येही अशा बातम्यांचा पेव फुटला आहे. जिल्ह्याला अधिकची खासदारकी मिळावी, ही नक्कीच मानाची बाब आहे; पण ही चर्चा ऐकल्यावर सामान्य कार्यकर्त्याच्या मनात मात्र नक्कीच खदखद निर्माण होऊ शकते. कारण पुन्हा एकदा या जागेसाठी पाटील बंधूंच्याच नावाची चर्चा सुरू आहे.
खरंतर वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच प्रमुख पदे त्यांच्याकडे आहेत. मग सरपंचपद असो, कारखान्याचे संचालकपद असो तिथेही पाटील बंधू, जिल्हा बँकेचे संचालकपद असो तिथेही पाटील बंधू किंबहुना साखर कारखान्याचे असो किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असो तिथेही पाटील बंधूच आहेत. आज सातारा जिल्ह्याला राज्यसभेच्या माध्यमातून खासदारकीची संधी येत आहे, ती सुद्धा पुन्हा एकदा पाटील बंधूंच्याच घरात जाणार असेल, तर मग सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय?
लक्ष्मणराव तात्यांचे वारसदार
सर्वच पदे एकाच घरांमध्ये अशा पद्धतीत जाणार असतील तर ही एकाधिकारशाही, घराणेशाही आहे. मग लोकशाही राहिली कोठे? आम्हाला एवढेच म्हणायचे आहे, की (कै.) लक्ष्मणराव पाटील तात्यांच्या विचारांचे वारसदार तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल, तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवरती पाठवून दाखवा. अन्यथा, तुम्हाला लोकनेते किसन वीर आबा आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगण्याचा अधिकार राहणार नाही, असेही डॉ. नितीन सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.
