नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दोड्डा गणेश याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. केनिया संघाची जबाबदारी आता दोड्डा गणेशच्या खांद्यावर असणार आहे. 2012-13 मध्ये दोड्डा गणेश याने गोवा संघाची प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी इनिंग सुरु केली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 च्या दृष्टीने दोड्डा गणेशला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. यात केनिया संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. एकेकाळी क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या केनियन संघाला पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाच्या पटलावर आणण्याची जबाबदारी दोड्डा गणेशच्या खांद्यावर असणार आहे. दुसरीकडे, सप्टेंबर महिन्यात केनियन संघ आयसीसीच्या डिव्हिजन दोन चॅलेंज लीगमध्ये भाग घेणार आहे. या लीगमध्ये पापुआ न्यू गिनी, कतार, डेन्मार्क आणि जर्सी हे संघ असणार आहेत.
दोड्डा गणेश याने नवी जबाबदारी स्वीकारताना सांगितलं की, ‘केनिया क्रिकेट संघाचं मुख्य प्रशिक्षकपद मिळणं ही अभिमानाची बाब आहे.’ या पोस्टसह दोड्डा गणेशने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात दोड्डा गणेश केनिया संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. दोड्डा गणेश याच्यासोबत माजी केनियन क्रिकेटपटू लॅमेक ओन्यांगो आणि जोसेफ अंगारा हे मदतीला असणार आहेत. दरम्यान, केनियाचा संघ टी20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरला तर दोड्डा गणेशचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.
दोड्डा गणेशची आंतरराष्ट्रीय पातळीवर तशी काही खास कारकिर्द राहिली नाही. गणेशने टीम इंडियासाठी फक्त 5 सामने खेळला आहे. त्यात 4 कसोटी आणि एका वनडे सामना खेळला आहे. चार कसोटी सामन्यात दोड्डा गणेशने 25 धावा केल्या आहेत. तसेच 5 गडी बाद केले आहेत. दोड्डा गणेश फक्त एकच वनडे सामना खेळला आणि त्याने 1 गडी बाद केला आहे. तर फलंदाजीत 4 धावा केल्या आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये दोड्डा गणेशने 10739 धावा केल्या आहेत आणि 365 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने 89 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 128 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोड्डा गणेशने 6 वेळा 10 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. तर 20 वेळा पाचपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. दोड्डा गणेशने कर्नाटक संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
