मुंबई : सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाल्याची उदाहरणं पाहिलीच असतील. याच सोशल मीडियामुळे एका डान्सरला थेट ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत चित्रपट करण्याची मोठी संधी मिळाली आहे. इमान्वी असं तिचं नाव असून प्रभाससोबतच्या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पदार्पण करतेय.
‘सीता रामम’चे दिग्दर्शक हानू राघवपुडी यांनीच इमान्वीची निवड केली आहे. ‘फौजी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून इमान्वीच्या फॉलोअर्समध्ये आणखी वाढ होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हानू यांनी इमान्वीच्या निवडीबद्दल सांगितलं आहे.
“नवीन प्रतिभा शोधण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम आणि सर्वांत सोपं साधन आहे. योग्य प्रतिभेपर्यंत कसं पोहोचायचं हे इंडस्ट्रीतल्या अनेकांना कळत नाही. पण सोशल मीडियाची यात नक्कीच मोठी मदत होते. इमान्वी दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच ती प्रतिभावान आहे”, असं ते म्हणाले.
इमान्वीच्या निवडीविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “अनेकांप्रमाणे मीसुद्धा तिच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले होते. ती उत्तम भरतनाट्यम नृत्यांगणा आहे. पण या सर्वांत तिचे डोळे अत्यंत सुंदर आहेत. तिच्या डोळ्यांतून अनेक भावभावना सहज व्यक्त होतात. म्हणून तिला संधी देण्याचा विचार केला. अर्थात हा निर्णय फक्त माझाच नव्हता, त्यात टीमचाही समावेश होता.”
या चित्रपटात प्रभास आणि इमान्वी यांच्यासोबतच मिथुन चक्रवर्ती आणि जयप्रदा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. इमान्वी तिच्या डान्सच्या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
