पुणे : ऐन परिक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी आंदोलनाचं हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परिक्षांचे पेपर असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मागच्या तीन दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची आता MPSC आयोगानेही दखल घेतली आहे. या आंदोलनावर एमपीएससी आयोगाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आज एमपीएससी आयोगाने तातडीने या संदर्भात बैठक बोलावली आहे.. ट्विट करत एमपीएससी आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय होतं? नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल.
एमपीएससी आयोगाने या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे, असं ट्विट MPSC आयोगकडून करण्यात आलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. आज निर्णय झाला नाही तर शरद पवार यांनीही आंदोलनात सामील होण्याचा इशारा दिला आहे. या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे.
राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट कराव्यात, या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरत या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवार यांनीही दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीत काय घडतं? काय निर्णय होतो? हे पाहणं महत्वाचं असेल.
