रिपाई संघटनांनी सातारा केला बंद
सातारा : अनुसूचित जाती व जमाती यांना क्रिमिलेयर पद्धत लागू करून या वर्गातील शोषित समाजाला आरक्षणाचे लाभ देण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्य खंडपीठाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जबरदस्त विरोध होत असून भारतातील दलित संघटनांनी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. सातार्यात या बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर आंबेडकरवादी संघटनांनी रस्त्यावर उतरून सातार्यातील दैनंदिन व्यापार, व्यवहार ठप्प केले.
दिवसभर या आंदोलनाची झळ बसल्याने बाजारपेठेचे नियमित कामकाज होऊ शकले नाही. या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी गांधी मैदान ते पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पायी रॅली काढली होती. सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्य समितीने अनुसूचित जाती व जमाती यांच्यामध्ये क्रिमीलेअर पद्धत अवलंब करून या जमातीमधील आरक्षणाचा लाभ न मिळणार्यांना ते मिळावे यासंदर्भात एक ऑगस्ट रोजी निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयाद्वारे दलित समाजामध्ये फूट पडणार असून त्यांच्या एकतेला बाधा निर्माण होत असल्याचा दलित संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे भारतामध्ये संपूर्ण आंबेडकरवादी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सातार्यात प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेनऊ वाजता बाजारपेठ सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासात दलित संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी व्यापार्यांना दुकाने बंद करायला लावली. काही कार्यकर्त्यांनी थेट दुकानाच्या समोर येऊन दुकानाचे शटर जबरदस्तीने बंद केले, तर काही महिला सदस्य हातात दांडके घेऊनच रस्त्यावर उतरल्या होत्या. या बंदच्या पद्धतीबाबत व्यापार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात याबाबतची तातडीने बैठक घेण्यात आली. दिवसभर बाजारपेठेचे कामकाज होऊ शकले नाही. हा एकदिवसीय बंद नसून यापुढे मोठ्या आंदोलन उभे करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे कदाचित हा बंद दोन दिवस लांबतोय की काय, अशी व्यापारी वर्गामध्ये संभ्रमावस्था आहे.
