रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धरणे आंदोलन
सातारा : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद आहे की, कोलकत्ता येथे झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीवर अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आली. मुंबई बदलापूर येथील चार वर्षाच्या चिमूरडींवर अक्षय शिंदे या नराधमाने अत्याचार केले. या दोन्ही प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दहिवडी, जिल्हा सातारा येथील नराधम बापाने शिखर शिंगणापूरच्या डोंगरामध्ये आपल्याच मुलीवर अत्याचार केला. या घटना माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत.
अशा नराधमांना कोणतीही दयामाया न दाखवता तात्काळ फासावर लटकवण्यात यावे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला थोडीशी सवलत द्यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा नराधमांचा ताबडतोब बंदोबस्त करेल, अशी मागणी दादा ओव्हाळ यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचे खटले फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून गुन्हेगारांना तात्काळ फासावर लटकवले गेले पाहिजे. अन्यथा सातारा जिल्ह्यात रिपाई आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दादा ओव्हाळ यांनी दिला आहे.
